पुणे: डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतिदित्यर्थ असलेल्या शिक्षक दिनानिमित्त प्रा.देवदत्त पाठक लिखित इयत्ता पाचवी ते सातवीसाठी नाटकाच्या तासाचे नवीन अभ्यासक्रमीय पुस्तकाचे पाच सप्टेंबरला प्रकाशन झाले आहे. वर्तन शोध आणि वर्तन तंदुरुस्तीसाठी हे खेळ पुस्तक परिपाठ ठरू शकते.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये रंगभूमी कलेला प्राधान्य देऊन तो विषय आता, अभ्यासक्रमामध्ये येत आहे. यासाठी तयार असलेले ४० रंगमंचीय खेळांचे २२ वे पुस्तक लिहून पूर्ण झाले आणि ते प्रकाशित झाले, याचा खूप आनंद होतो आहे, असे प्रतिपादन नाटकाचा तास या पुस्तकाचे लेखक देवदत्त पाठक यांनी केले आहे .
रूढ अर्थाने असलेला शैक्षणिक दृष्टिकोन यापेक्षा वेगळे, हटके आणि वागायला शिकवणारे व विचार आणि कल्पनांना व्यक्त करायला संधी देणारे रंगमंचीय खेळांचे हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना घडवायला सुद्धा उपयोगी ठरेल. याचा उपयोग शिक्षकांनी शाळेच्या वेळात इतर विषयांच्या प्रमाणेच करून त्याची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन त्याचा गुणात्मक प्रगती दर्जा प्रगती पुस्तकामध्ये द्यावा व मुलांच्या व्यक्तिमत्वाला प्रभावी आणि कलासक्त ही कसे करता येईल यासाठी या पुस्तकाचा उपयोग करावा , असेही मत व्यक्त केले.
विशेष म्हणजे या पुस्तकात नाटकाच्या तासाच्या माध्यमातून लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा कशी घ्यावी, याचाही नमुना दिलेला आहे.लवकरच इयत्ता आठवी ते दहावी साठी नाटकाच्या तासाचे पुस्तक सर्वांच्या भेटीला येत आहे असे बाल रंगभूमी अभ्यासक मिलिंद केळकर यांनी प्रकाशनाच्या या निमित्ताने जाहीर केले. इयत्ता पहिली ते दहावी साठी रंगमंचीय खेळांचे नाटकाचा तास हे पुस्तक अभ्यासक्रम म्हणूनही उपयोगात येईल आणि त्याचा सर्व शैक्षणिक संस्थांनी जरूर वापर करावा असे आवाहन यानिमित्ताने देवदत्त प्रकाशनच्या उषा देशपांडे यांनी केले .