विद्यानिधी शैक्षणिक संकुलात ‘उद्यमलक्ष्मी २०२५’ दिवाळी मेळ्याचे आयोजन!

मुंबई:जुहूच्या मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांच्या सर्वांनी विकासासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. विद्यानिधी व्रजलाल पारेख हायस्कूल, श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर व इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट टियारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्यमलक्ष्मी २०२५’ दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले.या मेळ्यात विद्यार्थी व उद्योजिका माता पालकांनी सहभाग नोंदवला. यात एकूण १८ दालनांचा (स्टॉल्स) सहभाग होता. त्यांनी विविध खाद्यपदार्थ व दिवाळी वस्तूंची विक्री या दालनांवरून (स्टॉल्स) करण्यात आली. महिला पालक व सहभागी विद्यार्थी यांच्यात उद्यमशीलता संक्रमित व्हावी, यासाठी सर्व दालन धारकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

मुलांमधील उद्यमशीलता ही विद्यार्थी दशेपासूनच विकसित केल्यास, भविष्यात त्यांच्याकडून उद्योगांची निर्मिती होऊ शकते. नोकरदार निर्मितीपेक्षा, नोकरी देणारा उद्योजक निर्माण करणे काळाची गरज आहे असे विचार शाळेच्या मुख्याध्यापिका नीलम प्रभू यांनी यावेळी व्यक्त केले.

या दिवाळी मेळ्याला इनरव्हील ऑफ बॉम्बे एअरपोर्ट टियाराच्या अध्यक्ष सोनाली पारेख त्यांच्या मातोश्री सुधा पारेख व नेहा मिस्त्री यांनी भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. साधना मोढ व आजीव सदस्य डॉ. कीर्तीदा मेहता यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन यापुढेही अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यानिधी शैक्षणिक संकुलातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.