नादब्रह्म… एक सुरेल संस्मरण

मुंबई: सतार भास्कर पं. रविशंकर यांच्या १०५ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून शाळेचे माजी विद्यार्थी प्रख्यात सतार वादक पं.चंद्रशेखर फणसे प्रस्तुत विद्या विकास मंडळ आयोजित नादब्रह्म… एक सुरेल संस्मरण हा सतार वादनाचा सुरेल कार्यक्रम अत्यंत रम्य वातावरणात अंधेरीच्या विद्या विकास मंडळ सभागृहात रविवार दिनांक १६ नोव्हेंबरला पार पडला.

पं. चंद्रशेखर फणसे व त्यांच्या सहकलाकारांनी सुमधुर,नाजूक आणि भावस्पर्शी प्रस्तुती सादर करून उपस्थितांना संगीताच्या अद्वितीय अनुभूतीने भारावून टाकले. पं. रविशंकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांवर आधारित या कार्यक्रमात विविध राग व तानांच्या लयबद्ध मांडणीने व झंकारणाऱ्या सुरांनी संपूर्ण सभागृह सुरेल वातावरणात रंगून गेले. उपस्थित रसिकांसाठी हा एक अविस्मरणीय सांगितिक क्षण ठरला. यावेळी अनुभवलेला आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

पं.अमरेंद्र धनेश्वर, पं.सदानंद नायमपल्ली प्राचार्य केशव परांजपे, नानासाहेब दिवाणे अशा दिग्गज कलाकारांनी व दर्दी संगीतप्रेमींनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे कलात्मक संवेदना विकसित होतात आणि भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यास मदत होते. संस्थेने पुढील काळातही असे गुणवत्तापूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत अशा प्रतिक्रिया कार्यक्रमानंतर निमंत्रित मान्यवरांनी व्यक्त केल्या.