मुंबई: ‘सुप्रिया प्रॉडक्शन’तर्फे दरवर्षी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेची यंदाची प्राथमिक फेरी अलीकडेच पार पडली. या फेरीतून एकूण सात एकांकिकांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. यंदाच्या या स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवार, २९ जानेवारी रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सकाळी ९:०० ते रात्री ९:०० या वेळेत होणार आहे. मालवणी, घाटी, माणदेशी अशा विविध बोलीभाषांतील एकांकिका यावेळी सादर होणार आहेत. सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे.
‘सपान’ (डॉक्टर्स थिएटर ग्रुप – माणदेशी), ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ (सृजन द क्रिएशन – मालवणी), ‘पाकळ्या’ (नक्षत्र कलामंच – खान्देशी), ‘डिझाईन’ (डॉ. टी.के.टोपे रात्र महाविद्यालय – घाटी), ‘त्यात काय!’ (एकदम कडक नाट्यसंस्था – घाटी), ‘सत्य’ (नाट्यारंभ एन.के.टी.टी. – मालवणी) आणि ‘पाकिस्तानचं यान’ (नाट्यांकुर – घाटी) या एकांकिकांमध्ये आता अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर झालेल्या एकांकिकांतून पंकज गुप्ता, दर्शन पाटील, प्रियांका जाधव, विनायक आभाळे, देवेंद्र देव आणि डॉ. मेघा गावडे यांना अभिनयाची पारितोषिके जाहीर झाली आहेत. रंगकर्मी मंगेश सातपुते व संदीप रेडकर यांनी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहिले. आता सर्वांचे लक्ष या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे लागले आहे.