मुंबई : जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहुण्या मेजर मोहिनी गर्गे -कुलकर्णी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर सादर झालेल्या सांकृतिक कार्यक्रमांनी परिसर दुमदुमून गेला. मेजर मोहिनी गर्गे -कुलकर्णी यांच्या ओजस्वी संदेशाने सर्व भारावून गेले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांशी व शिक्षकांशी संवाद साधून उज्ज्वल भविष्यासाठी शालेय जीवनापासूनच संस्कार शिक्षण घ्यावं. राष्ट्रसेवेकरीता आर्मीमध्ये गेलात तर उत्तमच पण अन्यथा जे कोणते क्षेत्र निवडाल त्यात नेतृत्व करण्याची पात्रता आणून राष्ट्रउभारणीत मदत करा, असा संदेश दिला.
नगरसेवक दीपक कोतेकरांचा सत्कार
संस्थेचे कर्मचारी दीपक कोतेकर हे जुहू विभागातून बहुमताने नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण काब्रा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक यशाचे गौरव
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्षेत्र व विषयांतील स्पर्धांमध्ये विभाग,राज्य व देशस्तरीय यश संपादित करणाऱ्या विद्यानिधीच्या १४ शाखांतील विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचं विशेष कौतुक प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी यांनी केलं व सर्वांना सन्मानित केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात लेझिम, संचलन, टाळी योग, नाटुकले, नृत्य, लाठीकाठी, मल्लखांब, गीतगायन, भाषण व सर्वांग सुंदर डंबेल्स प्रात्यक्षिके सादर केली.
रक्तदान शिबीर
कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड एन्व्हायरनमेंट स्टडीज् च्या विद्यार्थ्यांनी कुपर हाँस्पिटल च्या रक्तपेढीच्या सहाय्याने रक्तदान शिबीराचे आयोजन केलं.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण काब्रा, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, कार्याध्यक्ष संजीव मंत्री, कोषाध्यक्ष विनायक दामले, सर्व विभागांचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक-विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत पाटील व संगिता तिवारी यांनी केले.