मुंबई: इंडियन परफॉर्मिंग राइट सोसायटी लिमिटेड (IPRS) आणि कोरियन म्युझिक कॉपीराइट असोसिएशन (KOMCA) कोलॅब या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भारत-कोरियन सांगीत सहकार्य कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला. १३ नोव्हेंबरला अंधेरीमध्ये आयोजित विशेष संगीत सत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली. उद्योगक्षेत्रातील मान्यवर आणि विशेष अतिथी यांच्या उपस्थितीत कोलॅबच्या उदयोन्मुख कलाकारांच्या सादरीकरणांचा आनंद घेण्यासाठी उत्साहपूर्ण वातावरणात रसिक जमले होते. कोलॅबच्या गीतलेखन शिबिरात रचण्यात आलेली अप्रतिम गाणी पहिल्यांदाच ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली. या निमित्ताने सृजनशीलतेची जादू आणि अनोखे सहकार्य याचा अनुभव प्रेक्षकांना प्रत्यक्ष घेता आला. या कार्यक्रमामुळे कलाकारांना आपल्या उत्कृष्ट रचनांचे सादरीकरण करण्यासाठी एक नवे व्यासपीठ मिळाले. भारतीय आणि कोरियन संगीताचे अनोखे मिश्रण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेले. या अनुभवामुळे कलाकारांना प्रसिद्धी आणि करिअरच्या संधी अधिक उपलब्ध झाल्या. त्यांच्या सृजनशीलतेचा ठसा उपस्थित मान्यवरांवर उमटला.
६ ते १२ नोव्हेंबर २०२४ दरम्यान जमरूंग येथील विजयभूमी विद्यापीठाच्या ट्रू स्कूल ऑफ म्युझिकमध्ये भारत आणि दक्षिण कोरियातील १९ संगीतकारांनी सांस्कृतिक संयोगातून संगीत रचना साकारल्या. गीतलेखन, संगीत रचना आणि निर्मिती या विषयांवरील सखोल सत्रांद्वारे त्यांनी भारतीय आणि कोरियन शैलींची सांगड घालून जागभरातील रसिकांना आवडेल, अशा संगीताची निर्मिती केली. या गाण्यांच्या शिबिराचे क्रिएटिव्ह डायरेक्टर बंटी बैंस आणि मयूर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कलाकारांनी आपापल्या सांस्कृतिक पार्श्वभूमी व वेगळ्या संगीत शैलींचा उपयोग करून ऐतिहासिक सांस्कृतिक देवाणघेवाणीची ऊर्जा प्रतिबंबीत करणाऱ्या संगीताची निर्मिती केली.
आयपीआरएसच्या संचालक मंडळाचे सदस्य, गीतकार, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक मयूर पुरी म्हणाले, ‘कोलॅबमुळे भारत आणि कोरियातील तरुण सर्जनशील कलाकारांना एकत्र येऊन त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक सहयोगात्मक मंच मिळाला. या उपक्रमामुळे व्यावसायिक मर्यादांपलीकडे जाऊन कलाकारांना त्यांच्या शैली आणि सांस्कृतिकतेचा नैसर्गिकपणे संगम साधता आला. भारतीय आणि कोरियन संगीत परंपरेतील वैभव एकत्र पाहणे खूप प्रेरणादायी ठरले आहे. भविष्यात आणखी सांस्कृतिक भागीदाऱ्या घडवून आणण्यासाठी या मंचाची व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’ केओएमसीएच्या संचालक मंडळाचे सदस्य किम किबॉम म्हणाले, ‘या शिबिरामुळे कोरियन कलाकारांच्या सर्जनशीलतेत आमूलाग्र बदल झाला आहे. त्यांना त्यांच्या परिचित सर्जनशील सवयींपासून बाहेर पडण्याची आणि भारतीय कलाकारांसोबतच्या सहकार्यातून प्रेरणा घेण्याची संधी मिळाली. भारताच्या वैविध्यपूर्ण संगीत शैली आणि संस्कृतीचा अनुभव घेतल्यामुळे त्यांचे कलात्मक दृष्टिकोन अधिक व्यापक झाले आहेत. दोन्ही देशांमधील कलाकार आणि निर्मात्यांसोबतच्या सहकार्यामुळे त्यांना अशा सांस्कृतिक देवाणघेवाणीचा अनुभव मिळाला, जो यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. केओएमसीएच्या कलाकारांना वैयक्तिक पातळीवर विकसित होण्यासाठी नक्कीच या अनुभवाची नक्कीच मदत होईल आणि कोरियन संगीत क्षेत्रात ताज्या, नावीन्यपूर्ण निर्मिती करण्यास याचा उपयोग होईल.’ गीतकार, संगीतकार, निर्माता आणि बंटी बैंस प्रोडक्शन्सचे सीईओ बंटी बैंस म्हणाले, ‘कोलॅबचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि गाण्यांच्या शिबिराचा क्यूरेटर म्हणून काम करणे हा एक अत्यंत समाधानकारक अनुभव होता. कलाकारांनी उल्लेखनीय प्रतिभेचे दर्शन घडवलेच, त्याचप्रमाणे परस्परांते सांस्कृतिक प्रभाव सहज स्वीकारले आणि भारतीय व कोरियन परंपरांचा सुरेख संगम साधणाऱ्या संगीताची निर्मिती केली. सृजनशीलतेला वाव दिल्यामुळे पारंपरिकता आणि आधुनिकतेचं मिश्रण असलेल्या अप्रतिम रचना तयार झाल्या. या गाण्यांमध्ये खऱ्या अर्थाने वैविध्यपूर्ण प्रतिभा आणि वैशिष्ट्यपूर्ण संगम दिसून येतो. हाच कोलॅबचा गाभा आहे. या गाण्यांनी दर्जा व सृजनशीलतेच्या सर्व अपेक्षा ओलांडल्या आहेत.’
आपीआरएसचे सीईओ राकेश निगम म्हणाले, ‘जेव्हा कलाकारांना हिट गाणी तयार करण्याच्या दबावाशिवाय प्रयोग करण्याची मोकळीक मिळते, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभावी संगीत तयार होते. या मोकळ्या आणि सहकार्यपूर्ण वातावरणातून कलाकारांनी प्रेरणादायी आणि आशादायक गाणी तयार केली आहेत.’ ‘या उपक्रमाने माझ्यात प्रचंड सकारात्मकता आणि कृतज्ञतेची भावना निर्माण झाली आहे. हा अनुभव माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक आनंददायी होता. हा प्रवास असाच पुढे सुरू ठेवण्यास, उदयोन्मुख कलाकारांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यास आणि जागति स्तरावरील संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या संबंधांना चालना देण्यास मी उत्सुक आहे.’ मुंबईत आयोजित कोलॅबच्या संगीत सत्रात या विलक्षण सहकार्याची सांगता झाली. त्याचप्रमाणे भारत व दक्षिण कोरिया या दोन देशांमधील नव्या कलात्मक भागीदारीची सुरुवातही झाली. आयआरपीएस व केओएमसीओ या दोन्ही संस्था अशा उपक्रमांच्या माध्यमातून अर्थपूर्ण सांस्कृतिक संबंधांना चालना देत असतानाच कोलॅबच्या निमित्ताने नवोदित कलाकारांना जागतिक स्तरावर ओळख मिळवण्यासाठी आणि त्यांच्या संगीताला उंचावण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ तयार झाले आहे.