मुंबई : ‘मुलीच्या आयुष्यातील तिचा पहिला हिरो हा बाप असतो..’ या कथाविश्वाभोवती गुंफलेल्या बापमाणूस चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘फादर्स डे’ रोजी या चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं,ज्याला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. बाप आणि मुलीच्या नात्याची मनाला स्पर्श करणारी एक सुंदर गोष्ट या चित्रपटातून सांगण्यात आली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूजबम्प्स् एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन यांचा ‘बापमाणूस’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी आपल्या भेटीस येत आहे. अभिनेता पुष्कर जोगनं या चित्रपटात वडीलांची भूमिका साकारली आहे, तर लहान मुलीच्या भूमिकेत बाल कलाकार किया इंगळे आपल्याला दिसणार आहे.
‘बापमाणूस’ या चित्रपटाचं दिग्दर्शन योगेश फुलपगारे यांचे आहे. आनंद पंडित,रुपा पंडित आणि पुष्कर जोग यांनी चित्रपटाची निर्मिती केलेली आहे तर वैशल शाह,राहुल दुबे चित्रपटाचे सह-निर्माते आहे. पुष्कर जोग,किया इंगळे व्यतिरिक्त अनुषा दांडेकर,कुशल बद्रिके,शुभांगी गोखले यांनीही ‘बापमाणूस’चित्रपटात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चित्रपटाची कथा इमिआरा हिची आहे. सोपान पुरंदरे चित्रपटाचे छायाचित्रकार आहेत तर चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी रवी झिंगाडे यांनी सांभाळली आहे.
‘बापमाणूस’ चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी अभिनेत्री अनुष्का दांडेकर म्हणाली, ‘मी खूप दिवसांनी चित्रपटात काम करतेय त्यामुळे अर्थातच ‘बापमाणूस’ साठी शूट करताना मी खूप उत्साही होते. त्यात या चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये शूट होणार असल्यामुळे माझ्यासाठी तो एक बोनस होता. मी या चित्रपटासाठी मराठी भाषेवर खूप मेहनत घेतली आहे. माझं मराठी माझ्या इतर सह-कलाकारांच्या तुलनेत कुठे कमी पडू नये, यासाठी चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मराठी भाषेच्या उच्चारांचं आणि संवादफेकीचं मी रीतसर प्रशिक्षण घेतलं. आणि त्यामुळे मला माझ्या भूमिकेला अधिक चांगल्या पद्धतीनं न्याय देता आला. मी चित्रपटात जी भूमिका साकारतेय ती बरीचशी माझ्यासारखीच आहे,पण माझ्यापेक्षा अधिक कूल आणि आत्मविश्वासू आहे. आणि मला तिच्यासारखं प्रत्यक्ष आयुष्यात व्हायला नक्की आवडेल. ही कथा मनाला स्पर्श करणारी आहे,एका वडील आणि मूलीच्या नात्याची कथा,जिथे एक बाप एकट्यानं आपल्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी धडपडत असतो. चित्रपटात कुटुंब,प्रेम आणि पालकत्व खूप छान पद्धतीनं एकत्र गुंफण्यात आलं आहे. हा चित्रपट कालच्या आणि आजच्या अशा दोन्ही पिढ्यांना जवळचा वाटेल. अशा एका सुंदर चित्रपटाशी जोडलं गेल्याचा मला खूप अभिमान वाटतो,आणि त्याच्या प्रदर्शनाची मी मनापासून वाट पाहतेय.’
आईच्या निधनानंतर वडीलांनी आपल्या लहान मुलीला एकट्यानं सांभाळण्याचा धरलेला हट्ट, तो पूर्ण करण्यासाठी वडीलांची चाललेली धडपड, अनेकदा लहान मुलीच्या भाबड्या प्रश्नांना उत्तरं देताना वडीलांच्या मनात उठणारा भावनिक कल्लोळ चित्रपटात अगदी उत्तम मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, याची कल्पना ट्रेलर पाहिल्यावर लागलीच येते. एकटा बाप मुलीचा सांभाळ करू शकत नाही या समाजाच्या मानसिकतेला चोख उत्तर ‘बापमाणूस’ या चित्रपटातून देण्यात आलं आहे. ‘व्हिक्टोरिया’ या आपल्या हॉरर चित्रपट निर्मितीनंतर आता प्रेक्षकांसाठी बाप-मुलीच्या नात्याची भावनिक गोष्ट घेऊन येण्यास आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूजबम्प्स् एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन सज्ज आहेत.