मुंबई: मुंबई उपनगरातील अंधेरी येथील जुहूच्या ‘उपनगर शिक्षण मंडळ संचलित’ विद्यानिधी व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी शाळेतीलच भवन क्रमांक १ किशिनचंद वालेचा सभागरात मोठ्या उत्साहात पार पडले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याजीवनावर प्रेरणादायी अशी या कार्यक्रमाची बांधणी केली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी विद्यार्थी विधिज्ञ सुचित पांचाळ हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी रंगभूमी वरील चिकित्सक दिग्दर्शक चंद्रकांत कणसे, प्रसिद्ध अभिनेते अमोघ चंदन, हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात, इंस्टास्टार अभिनेत्री भाग्यश्री जोईल तसेच जुहू अरायझन ग्रुपचे मधुकर राठी ,माजी शिक्षक, मैराळे यांनी शोभा आणली .संस्थेचे अध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डाॅ. साधना मोढ, मान.सदस्य डाॅ.किर्तीदा मेहता,जोत्स्ना कुळकर्णी यांनी देखील विद्यार्थांच्या कौतुकासाठी उपस्थिती लावली.
२०२५-२६ जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट शाळा ठरलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांचे कौशल्य, अंधश्रध्देवर आधारित प्रहसन, समूहगीते व इंग्रजी नाटिका,मल्लखांब, तायकोंडो,लाठिकाठी सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सर्वांकडून कडून भरभरून दाद मिळाली.
शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषके आणि प्रमाणपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सातत्य, परिश्रम व शिस्त यांचे महत्त्व सांगून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातच का घालावे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे विद्यानिधी शाळा असल्याचे प्रतिपादन केले. ही शाळा कला, संस्कृती,संस्कार जपत , भविष्याधारित पायथन प्रोग्रामिंग सारखे कौशल्य विकसन करते व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर देते हे कौतुक करतानाच पालकांनी मराठी शाळेत पाल्याचा प्रवेश घेतल्या बाबत त्यांचे अभिनंदन ही केले.अतिथींनी मराठी माध्यमात शिकण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल शाळेचे शिक्षक, व्यवस्थापन आणि पालकांचे कौतुक केले. येथील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांच्या आनंदात भर म्हणून सध्या जनमानसात बसलेल्या ‘स्वर्गात आकाशगंगा’या नृत्याची झलक दाखविली.
स्नेहसंमेलनामुळे ३०० विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. अतिथींच्या भाषणाने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.