सुरेख वाद्यमेळ, तयारीच्या गायकीने रसिक तृप्त

बहारदार गीतांच्या रसरशीत सादरीकरणाने गानरसिकांना श्रवणानंदाची मेजवानी

नवी मुंबई : दृष्टीहीन गायक शफाक जाफरी याने सादर केलेली तेरी आँखोके सिवा दुनिया मे रखा वया है, चुरा लिया है, छुप गए सारे नजारे, कितना प्यारा वादा है, डफली वाले ही एकाहुन एक सरस गाणी, तसेच जुगल किशोर, जय कुमार, सी एम जोशी, प्राजवता चौबळ, अरुणा हेगडे, इति कार या तयारीच्या गायकांनी गायिलेल्या सुरेल गीतांनी रसिकांना तृप्त केले. ज्येष्ठ दिवंगत गायक मोहम्मद रफी यांच्या १०१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात पद्मावती एन्टरटेन्मेट प्रस्तुत दिवाना मुझसा नही या मोहम्मद रफींच्या गीतांचा समावेश असलेल्या चित्रपट गीतांच्या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन २६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते.

हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या कालखंडातील एकाहुन एक सरस युगुल गीते, एकल गीते, कव्वाली यावेळी रसिकांना ऐकायला मिळाली. वाद्यवृंदांचे युग काहीसे लोप पावत चाललेल्या सद्यस्थितीत या गाण्यांचे बहारदार आणि रससशीत सादरीकरण रसिकांना सुखावून गेले. यावेळी दृष्टीहीन गायक शफाक जाफरी यांना आर्थिक मदतीचे आवाहन आयोजक प्रदीप नायर यांनी केले असता त्यास गीतरसिकांना चांगला प्रतिसाद दिला. विशाल सपकाळ यांच्या संगीत संयोजनाची उत्तम साथ गण्यांना लाभल्याने कार्यक्रमास आणखी रंगत भरल्याचे मत गानरसिकांनी व्यक्त केले. लवकरच नवी मुंबई व पनवेल येथे आणखी प्रयोग करणार असल्याचे नायर यांनी यावेळी घोषित केले.