पंढरपूर:पंढरपूरात कोरोनानंतर प्रथमच प्रा. देवदत्त पाठक यांचे बालनाट्य शिबिर घेण्यात आले. कोरोनाने तर सर्वांचे हाल केलेच, पण त्यापेक्षा हाल झाले ते कलेचे आणि कलाकारांचे. त्या संपूर्ण कालावधीमध्ये कोरोनातही देवदत्त पाठक यांनी ऑनलाईन बालनाट्य शिबिर घेतली, सराव केले आणि त्याचे २५२ प्रयोग केले.
संपूर्ण जगातच रंगभूमी कला ही निस्तेज झालेली होती. त्यानंतरच्या काळात प्रथमच पंढरपूरातील दिलीप कोरके, दत्तात्रय जगताप आणि राजू ऊराडे यांनी प्रथमच जवळजवळ ४ वर्षाच्या कालावधीनंतर प्रा. देवदत्त पाठक यांचे बालनाट्य अभिनय शिबिर आयोजित केले. गुरु स्कूल गुफान आणि अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई, पंढरपूर शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने बालनाट्याचे खास लहानांसाठी हे शिबिर आयोजित केले गेले. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, क्षमता विकसन आणि ललित कौशल्य अर्थात सादरीकरण कलेमधले कौशल्य, याबाबत विशेष प्राधान्याने रंगमंचीय खेळांच्या माध्यमातून प्रा. देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी हे शिबिर घेतले. कोरोनानंतर झालेला परिणाम असताना सुद्धा हे शिबिर अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहाने घेतले गेले. या शिबिरात मुलांकडूनच बालनाट्य लेखन, ते केल्यानंतर त्याचे करायचे दिग्दर्शन, त्यात करायचा अभिनय, त्यामध्ये जागेचा करायचा विचार, पात्रांचा करायचा विचार, त्यांचं वागणं, तसंच रंगभूषा वेशभूषा याबाबतचा अभ्यास आणि सराव केला गेला. त्यासाठी माध्यम म्हणून रंगमंचीय खेळ ही एक ऊर्जा संकल्पना वापरण्यात आली.या निमित्ताने पंढरपुरात ही बाल रंगभूमीची असलेली चळवळ पुन्हा नव्याने सुरू झाली, याचा आनंद पंढरपूरकरांना झालाच आणि त्यापेक्षा मुलांनी छोटे छोटे तीन नाट्यप्रयोग शेवटच्या दिवशी सादर केले त्यामध्ये आमच्या प्रिय आई बाबांस भाग एक ,भाग दोन,तीन ,अशा प्रकारचे त्याचे स्वरूप होते. आई-बाबांना मुलांकडे, लक्ष द्यायला वेळ नाही,मुल घरामध्ये एकटे एकटेच सध्या राहू लागले आहे, आणि मुलांच्या अभ्यासाबाबत पालक काय दृष्टिकोनातून बघतात आणि पालक त्यावरती काय अपेक्षा ठेवतात अशा आशयाचे, विषयाचे छोटे नाट्य प्रयोग मुलांकडूनच करून घेण्यात आले,यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे, उत्साहाने, बोलत, वागत आणि कृती करत एक सुंदर नाट्य अनुभव सर्व पालक आणि इतर बाल मुलांना दिला.
मुलांचे व्यक्त होणे हे अधिक निर्दोष व्हावयाचे असेल तर रंगभूमी कला आणि त्याबाबतचे असलेले रंगमंचीय खेळ हे अत्यंत उपयोगी पडतात, प्रशिक्षण शिबिराची पद्धतच ही प्रायोगिक तत्त्वावर राबवायला हवी, असे मत प्रा. देवदत्त पाठक यांनी या निमित्ताने व्यक्त केले. समारोपाच्या दिवशी आर्यन खोबरे आणि अभिज्ञा उबाळे यांना सर्वोत्कृष्ट सहभागी कुमार बालरंगकर्मी म्हणून स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले हे शिबिराचे वेगळेपण. शिबिर घेण्यासाठी सर्व पालक आणि नाट्य परिषदेचे कार्यवाह, सहकार्यवाह यांनी मदत केली कोरोनानंतर प्रथमच सुरू झालेल्या या बालनाट्य शिबिरामुळे पंढरपूरातील छोट्या मुलांचा उत्साह आणि करण्याची इच्छा वाढली असून त्याचा भविष्य काळात मुलांना त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये निश्चितच उपयोग होईल आणि प्रयोग आणि स्पर्धेसाठी ती परत उभी राहतील, यात शंका नाही, असे प्रतिपादन प्रा. देवदत्त पाठक यांनी केले.