कल्याण:महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती महाराष्ट्र, बिर्ला महाविद्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २७ जुलै आणि रविवार २८ जुलै २०२४ असे दोन दिवस बिर्ला महाविद्यालयात नवलेखक शिबिर – प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व महाराष्ट्रातून आलेले साहित्य भारतीचे पदाधिकारी, साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेशचंद्र यांनी सर्वांचे स्वागत केले तर प्राचार्य डॉ. अविनाश पाटील हे अध्यक्षस्थानी होते. शिबिराचे उद्घाटक बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सन्माननीय अतिथी महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष डॉ. शितलाप्रसाद दुबे व प्रमुख अतिथी अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संघटन मंत्री श्रीधर पराडकर यांनी मार्गदर्शन केले.
दोन दिवसाच्या शिबिरात अखिल भारतीय साहित्य परिषदेचे (अभासाप) राष्ट्रीय महामंत्री ऋषीकुमार मिश्र, राष्ट्रीय मंत्री डॉ. दिनेश प्रताप सिंग, प्रमोद बापट व श्रीधर पराडकर यांनी साहित्याचे अधिष्ठान, भारतीय साहित्य परंपरा,साहित्यिक कार्यक्रम व उपक्रम, साहित्यिक संघटन व कार्यविस्तार, याचबरोबर लेखन कसे असावे, लेखकांकडून अपेक्षा, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबीरात झालेल्या प्रतिनिधींच्या रंगतदार कविसंमेलनात ५० हून जास्त प्रतिभावान कवींनी सहभाग घेतला. कविसंमेलनाचे अध्यक्ष साहित्य भारती उपाध्यक्ष विसुभाऊ बापट हे होते तर सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. दिवसभर झालेल्या विविध सत्रांचे सूत्रसंचालक म्हणून डॉ. शामसुंदर पाण्डेय, प्रा. विजय लोहार, कवी गितेश शिंदे व दिनेश नाईक यांनी काम केले.
धुळे ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या प्रवीण रतिलाल पवार या ताज्या दमाच्या तरूण लेखकाने लिहीलेल्या “ऑनलाईन प्रेमाची ऑफलाईन कहाणी” या सत्य अनुभवावर लिहीलेली कादंबरी, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे संघटनमंत्री श्रीधर पराडकर, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, साहित्य अकादमी दिल्लीचे प्रा. नरेंद्र पाठकसर, स्वामी रामतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. किरण भावसार, कवी गीतेश शिंदे व कादंबरीतील प्रत्यक्ष दोन पात्रे, यांच्या शुभहस्ते झाले. अशी आगळेवेगळी कादंबरी लिहिलेल्या लेखकाचा बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने डॉ. शामसुंदर पाण्डेय व विभाग प्रमुख डॉ. बालकवी सुरंजे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवीण पवारांचे हार्दिक अभिनंदन.
या शिबिरात ऐतिहासिक विषयावरील मराठी कादंबरीकार जनार्दन ओक, कवी व शिक्षिका निलांबरी बापट, हिंदी कवी मदनकुमार उपाध्याय, साहित्यिक रघुवंशी ठाणे व लेखक चंद्रिका प्रसाद मिश्र नाशिक यांचा साहित्यातील गौरवपूर्ण कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफल देवून सन्मान करण्यात आला. शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागप्रमुख, डॉ. भारती गोरे, साहित्य भारतीचे नितीन केळकर, शशीकांत घासकडवी, देगलुरचे प्रा. रविंद्र बेंबरे, कवी दुर्गेश सोनार यांचीही उपस्थिती होती. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी, बिर्ला महाविद्यालय हिंदी विभाग प्रमुख डॉ. बालकवी सुरंजे, साहित्य भारती कल्याण अध्यक्ष व बिर्ला महाविद्यालयाचे डॉ. शामसुंदर पाण्डेय, साहित्य भारतीचे डॉ. चंद्रशेखर भारती, सुनील म्हसकर, कोकण प्रांत कार्याध्यक्ष कवी प्रवीण देशमुख, मंत्री संजय द्विवेदी, प्रा. रूपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील आय टी टीम, बिर्ला महाविद्यालयातील व्यवस्थेत असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांनी मेहनत घेतली.