…आणि असा सुरु झाला “धर्मवीर – २” चा प्रवास

मुंबई:आनंद दिघे यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही मोठ्या प्रमाणात ठाण्यात आहे. आपल्या लोककारणी नेत्याला “धर्मवीर” चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर बघायला प्रेक्षक आतुर होते. “धर्मवीर” या चित्रपटला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला,  चित्रपट बघून अनेकजण भावूकही झाले आणि त्यांच्या आठवणी या पुन्हा एकदा नव्याने जाग्या झाल्या. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका अतिशय उत्कृष्ट होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही प्राप्त केले. 

आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेल्या या लोकनेत्याचा जीवनप्रवास चित्रपटाच्या एका भागातून दाखविणे शक्य नव्हते. “धर्मवीर” चित्रपटाच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे जगभरात पोहोचले आणि ‘असा माणूस होणे नाही’ हे ही सर्वांना समजलं. त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, त्यामुळेच आम्ही “धर्मवीर – २” करण्याचे ठरविले.

“धर्मवीर” चित्रपटाच्या वेळी माझ्या मोबाईलच्या वॉलपेपरवर धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो होता. कालांतराने मी तो बदलला. काही केल्या मनात इच्छा असूनही “धर्मवीर – २” चित्रपटाच्या गोष्टी या जुळून येत नव्हत्या. शेवटी मी दिघे साहेबांना मनापासून साद घातली आणि “धर्मवीर २” चित्रपट करण्याबाबतची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला खरे वाटणार नाही पण लगेच दुसऱ्या दिवशी सर्व गोष्टी या अचानकपणे लगेच जुळून आल्या आणि “धर्मवीर -२” चित्रपटाच्या कामाला सुरुवात झाली. म्हणजेच आजही दिघे साहेब हे आपल्या आजूबाजूला असल्याची प्रचिती मला मिळाली असे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितले.

ज्याप्रमाणे “धर्मवीर” चित्रपटाला रसिकप्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला त्यापेक्षाही “धर्मवीर – २” चित्रपटाला प्रतिसाद मिळेल याची आम्हाला आशा असल्याचे साहील मोशन आर्ट्सचे निर्माते मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी सांगितले. येत्या ९ ऑगस्टला “धर्मवीर – २” हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषेतून आपल्या भेटीला येणार आहे.