‘तोडी मिल फँटसी’ सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची अंकुश चौधरीची इच्छा

मुंबई: वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असूनही अनेक तरुण कलावंतांनी वाट धरली आहे ती रंगभूमीची. प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडतायेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावताहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे. याबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, त्यावेळी अभिनेता अंकुश चौधरी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी आणि नाटकातील कलाकार मंडळी उपस्थित होती.

या नाटकाला सहकार्य करण्याबद्दल अभिनेता अंकुश चौधरी म्हणाला, ‘माझ्या ‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक झालं आणि आजवर अनेक भाषांमध्ये त्याचे प्रयोग झाले. या एकांकिकेच व्यावसायिक नाटक व्हावे यासाठी ज्या दोन माणसांनी पुढाकार घेतला त्यातलं एक नाव म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दुसरं महेश मांजरेकर या दोन माणसांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे हे शक्य झालं. नव्या उमद्या काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी मी काय करू शकतो? तर त्यांना सहकार्य करू शकतो, म्हणून हा सहकार्याचा हात. या सहकार्याला अनुभवी अशा जिगीषा अष्टविनायक संस्थेचा भक्कम पाठिंबा मिळाल्याने ‘तोडी मिल फँटसी’ हे नाटक आता चांगल्या प्रकारे पोहचेल याची खात्री त्यांनी बोलून दाखविली. ‘तोडी मिल फँटसी’ सारखं उच्च दर्जाचं ब्रॉडवे नाटक ज्याचे जगभरात एकाच दिवशी अनेक प्रयोग होतील असं नाटक करण्याची इच्छा अंकुशने यावेळी बोलून दाखविली. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी असं नाटक आणलं तर आपण नक्कीच रंगभूमीवर पुनरागमन करू असं अंकुशने सांगताच, चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यास सहमती दर्शवली.

गिरण्यांच शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वी गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी.. याच फॅन्टसीवर बेतलेलं गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फॅन्टसी’ या नाटकाचे प्रयोग शुक्रवार १८ एप्रिल रात्रौ ८.३० वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, १९ एप्रिल रात्रौ ८.३० वाजता कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० एप्रिल रात्री ८.३० वाजता यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या ठिकणी रंगणार आहेत.

‘तोडी मिल फँटसी’ ही कथा आहे तीन मित्रांची – घंट्या, अम्या, शिऱ्या आणि त्यांच्या स्वप्नांची, ज्यांनी मुंबई ह्या स्वप्नांच्या नगरीमधे आपले जीवन व्यतीत केले आहे. ही कथा सुरू होते एका आलिशान रेस्टो-बारच्या वॉशरूममध्ये , जेव्हा त्या रात्री, जेव्हा घंट्या, अम्या आणि शिऱ्या त्यांच्या स्लम टुरिझम व्यवसायाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेणार असतात, तेव्हा ईशा सिंह नामक एक अत्यंत श्रीमंत मॉडेल, घंट्याच्या जीवनात अपघाताने प्रवेश करते आणि त्या सर्वांच्या जीवनात बदल घडतात. हे नाटक तुम्हाला एक संगीतमय प्रवास घडवते, तुम्हाला नाचवते, हसवते, रडवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरातील तुमच्या अस्तित्वाचा पुनर्विचार करायला लावते! या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मुंबईच्या या भूमिपुत्रांच्या फँटसीची गोष्ट नाट्य स्वरूपात उभी करण्याची संपूर्ण प्रकिया पुण्यात झाली आहे. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली अशा संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर केला आहे.

या नाटकाला देसी रिफ, अगस्ती परब आणि कपिल रेडेकरचं संगीत लाभलं आहे. नेपथ्य केतन दुधवडकर तर नेपथ्य निर्मिती प्रकाश परब यांची आहे. प्रकाशयोजना राहुल जोगळेकर, सचिन दूनाखे यांनी केली आहे. वेशभूषा शुभांगी सूर्यवंशी, परीजा शिंदे तर रंगभूषा प्रदीप दरणे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन अक्षय कुमार मांडे यांचे आहे.