‘३९ व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत’ ‘अडलंय ‘का’ प्रथम तर ‘दिव्या खाली दौलत’ला द्वितीय आणि ‘रंग जाणिवांचे’ तृतीय क्रमांकाने सन्मानित!

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

मुंबई: सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९ वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. माटुंगा येथे यशवंत नाट्यमंदिरात पार पडलेल्या या दोन दिवसांच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याच्या प्रथम पारितोषिकासह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाश योजना असे पाच पुरस्कार पटकावून कल्याण वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल,चे ‘अडलंय ‘का’ हे बालनाट्य प्रथम क्रमांक पटकावत अव्वल ठरले. अत्यंत तगडे आव्हान निर्माण करणाऱ्या १९ दर्जेदार बालनाट्यांमध्ये ही रंगतदार चुरस रंगली होती. रविकिरण मंडळाची ही स्पर्धा यंदा मंडळाचे ज्येष्ठ सभासद मनोहर नगरकर आणि कोकणच्या लालमातीतील रंगकर्मी रघुनाथ कदम यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आली होती. मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक परब यांचा कलाक्षेत्रातील कार्याबद्दल आणि हेमंत चव्हाण यांचा सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेच्या निकालासाठी विशेष अतिथी म्हणून ‘सन मराठी वाहिनी’चे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची विशेष उपस्थित होती. दोन्ही मान्यवरांचे ‘बालरंगभूमी’सोबत जिव्हाळ्याचे नाते असल्याचे दिसून आले. मुलांनी दाखवलेले अभिनय कौशल्य, सादरीकरणातील पकड आणि लेखकांनी खास तयार केलेल्या संहितांतील अद्भुत कल्पनाशक्ती, काळानुसार विषयंतील विविधता यामुळे यंदाची स्पर्धा अविस्मरणीय ठरली. या स्पर्धेत कलागुण दाखविणारे बालकलावंत उद्याचे तारे असणार आहेत असे दीपक राजाध्यक्ष यांनी उद्गार काढले.

या स्पर्धेचे परीक्षण लोकप्रिय युवा अभिनेत्री पूर्वा पवार, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर आणि ज्येष्ठ नाट्यसमीक्षक, निवेदक, कलादिग्दर्शक व पत्रकार नंदकुमार परशुराम पाटील यांनी केले. अभिनेते प्रमोद पवार, नारायण जाधव, महेंद्र पवार, विनोद पवार यांसह अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली.

सर्वोत्कृष्ट बालनाट्य, लेखन व दिग्दर्शनाच्या द्वितीय पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय अभिनेत्री या पुस्कारांवर ‘दिंडी ‘झ’ प्रतिष्ठान’च्या ‘दिव्या खाली दौलत’ने नाव कोरले तर सर्वात्कृष्ट अभिनय व लेखनाच्या प्रथम पुरस्कारासह सर्वोत्कृष्ट तृतीय बालनाट्य व दिग्दर्शनासह उत्तेजनार्थ अभिनेत्रीचा सन्मान ‘मुक्तछंद नाट्य संस्थेच्या ‘रंग जाणिवांचे’ला मिळाले. अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाऊंडेशन, पुणे यांच्या सर्कस या बालनाट्यास स्पेशल ज्युरी अवॉर्डने गौरवण्यात आले. तसेच पहिले उत्तेजनार्थ पारितोषिक पार्ले टिळक विद्यालय इंग्रजी माध्यम विलेपार्ले शाळेच्या ‘रे क्षणा’ ला, तर दुसरे उत्तेजनार्थ ‘संदेश विद्यालय, पार्क साईट’च्या ‘होता जिवा म्हणुन वाचला शिवा’ ला देण्यात आले.

रवीकिरण मंडळाचे अध्यक्ष नागेश नामदेव वांद्रे यांनी सांगितले, “गेल्या ३९ वर्षांची ही अनुपम परंपरा, रविकिरण मंडळाच्या तीन पिढ्यांनी मनापासून जपली आहे. गिरणगावच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या पूर्वजांनी सामाजिक मूल्यांचा आणि संस्कारांचा जो दिवा आमच्या हातात दिला, तो पुढील पिढीकडे अखंड तेजाने पोहोचवण्याचे आमचे कर्तव्य आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी की आमची नवी पिढीही प्रत्येक कसोटीवर उत्तमरीत्या खरी उतरते आहे. रवीकिरणची बालनाट्य स्पर्धा असो किंवा समाजाभिमुख उपक्रम—ही परंपरा आमची तरुण पिढी आगामी काळातही निष्ठेने, उत्साहाने आणि नवचैतन्याने पुढे नेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.”