‘शास्त्रीय उपशास्त्रीय गायनातील तबला संगत’ पुस्तक प्रकाशित

नवी मुंबई : ऑल इंडिया रेडिओची ‘बी हाय श्रेणी’ प्राप्त तबला वादक व तबला वादनातील संगीत अलंकार असलेल्या करावे गाव येथील संदेश राजे यांनी लिहिलेल्या ‘शास्त्रीय उपशास्त्रीय गायनातील तबला संगत’ पुस्तकाचे प्रकाशन १० नोव्हेंबरला वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहातील सोहळ्यात विख्यात तबलावादक पं. नाना मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर गानविदुषी डॉ.संध्या काथवटे, सुप्रसिध्द तबला वादक कौशिक बासू, गायक रघुनाथ फडके, डॉ अरुणा गायतोंडे, शिरीष काथवटे, पत्रकार राजेंद्र घरत उपस्थित होते.

सदर पुस्तक छान झाले असून त्याचा नव्याने तबला शिकणाऱ्यांना फायदा होईल असे मत यावेळी नाना मुळे यांनी प्रकाशनसमयी व्यक्त केले. या पुस्तकामागे संदेश राजे यांची मेहनत दिसत असून वाचक या पुस्तकाला चांगला प्रतिसाद देतील अशी अपेक्षा डॉ.संध्या काथवटे यांनी आपल्या भाषणातून मांडली. कौशिक बासू यांनी राजे यांची तबलावादनाप्रति चांगली बांधिलकी असून त्याचे प्रतिबिंब या पुस्तकातून वाचकांना पाहायला मिळणार असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या. पत्रकार राजेंद्र घरत यांनी तबला वादन, संगीत या ताणतणाव घालवणाऱ्या अलौकिक कला असून विख्यात तबलावादक भाई गायतोंडे यांचे दीर्घकाळ सानिध्य आणि मार्गदर्शन लाभलेल्या संदेश राजे यांनी दीर्घ मेहनतीने हे पुस्तक साकारले असल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतानाच सभागृहातील अल्प उपस्थितीकडे अंगुलीनिर्देश करत छापील माध्यमांच्या वाचकांप्रमाणे अशा चांगल्या कार्यक्रमांचे श्रोते, प्रेक्षकही समाजमाध्यमांनी पळवल्याची शंका येते असे आपल्या भाषणात नमूद केले. समाजमाध्यमांच्या अति आहारी गेल्याने गुरु-शिष्य परंपरेला धोका निर्माण झाला आहे की काय, लोक युट्युबवरील व्हिडिओंच्या मागे लागून वास्तव जीवनात मौलिक व उपयुक्त मार्गदर्शन करणाऱ्या गुरुंकडे पाठ फिरवण्याची भिती असल्याची शक्यताही घरत यांनी आपल्या भाषणातून मांडली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संदेश राजे यांनी तबला सोलो सादर केले. त्यांना सुरेख नगमा संगत विनोद पडगे यांनी केली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन धिरेंद्र ठाकूर यांनी केले.