विद्यानिधी शाळेत गुरु पौर्णिमा उत्सव साजरा !

मुंबई:”गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा…” विद्यानिधी शाळेने गुरुपौर्णिमा उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली. मुख्याध्यापक संतोष टक्के विद्यानिधी सिद्धीविनायक प्राथमिक शाळा आणि शिशू मंदीरचे प्रमुख पाहुणे, रात्र शाळा व्यवस्थापन सदस्य दाभोळकर सर आणि रोटेरियन उज्ज्वला सहलोत उपस्थित होते.

शाळेच्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, गीत, नृत्य आणि नाटूकल्या सह एक सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्रणाली बोडेकर या विद्यार्थिनीने आपल्या सर्व शिक्षकांना समर्पित “पुस्तक आपले गुरू” हा विचार घेऊन ‘कशासाठी यशासाठी ‘ लेखक शिवराज गोर्ले यांच्या पुस्तकाचे परीक्षण करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

रोटरी क्लबच्या उज्ज्वला सहलोत यांनी मुलांना आई वडिल हे प्रथम गुरू असून त्यांचा आदर करण्यास सांगितले. प्रमुख पाहुणे संतोष टक्के यांनी टीम विद्यानिधीच्या सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कलागुणांचे कौतुक केले. आज मराठी माध्यमातून मिळणारा हा मुल्यांचा ठेवा जतन करण्याचे मुलांना आवाहन केले

खास गुरू पौर्णिमेनिमित्ताने “लोका: समस्त: सुखिनो भवंतू” हा संदेश देणारा समर्पण निधी उपक्रम देखील विद्यानिधीमधील विद्यार्थ्यानी मनापासून पार पाडला. यावेळी आपल्या गुरूंच्या स्वभावातील सकारात्मक वैशिष्ट्य ओळखण्याचा खेळही खेळण्यात आला. विद्यार्थ्यांच्या खाऊच्या पैशातून वाचवलेल्या रक्कमेचे रूपांतर. समाजकार्यासाठी विधायक रुपात होताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शन आणि आपल्या गुरूंप्रती कृतज्ञतेच्या भावनेने झाली.