बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्ध-ॲड. निलम शिर्के – सामंत
मुंबई: बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत यांनी सांगितले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील २० जिल्ह्याच्या ठिकाणी लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ॲड. निलम शिर्के- सामंत पुढे म्हणाल्या की, बालसंस्कार घडविणारा पाहिला उपक्रम म्हणून जल्लोष लोककलेचा हा लोककला महोत्सव आयोजित केला आहे. केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न ठेवता पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लोककला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जात आहे यास उदंड असा प्रतिसाद मुलांकडून मिळाला आहे. दुर्लक्षित होत चाललेल्या किंबहुना लोप पावत चाललेल्या लोककलांविषयी, लोककलेतील तज्ञ मार्गदर्शक लोककलांची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोचविण्याचा प्रयत्न प्रशिक्षणाच्या माध्यमातून करत आहेत.
बालकांच्या प्रत्यक्ष लोककला सादरीकरणाचा महोत्सव साजरा होईल ज्यात लोककलांवर आधारित समूहनृत्य, एकलनृत्य, समूहगीत, एकलगीत व लोकवाद्य असे सादरीकरण होतील. यातून बालकांना प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जाणार आहेत.
बालरंगभूमी परिषदेच्या आज रोजी महाराष्ट्रात २५ शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी १९ जिल्ह्यात लोककला महोत्सव साजरा होत आहे. ज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, छ्त्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, सोलापूर, अकोला, नागपूर आदी जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सर्वच भागात लोककला महोत्सवाचे आयोजन केले आहे. असे महोत्सव प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी सांगितले.
लोककला महोत्सवात महाराष्ट्रातील किमान २५ हजार बालके सहभागी होतील. दिनांक २५ ऑगस्टपर्यंत सर्व प्रशिक्षण कार्यशाळा पूर्ण होतील. तर ३० सप्टेंबरपर्यंत सादरीकरण पूर्ण होईल. पहिला उपक्रम हा लोककला महोत्सवाचा असून दुसरा विशेष मुले अर्थात दिव्यांग मुलांसाठीचा महोत्सव ऑक्टोबर महिन्यात जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील बालकांसाठी कलासंस्कार घडवत नव्या पिढीला नव्या दिशा व नवे मंच उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
या पत्रकार परिषदेला ॲड. निलम शिर्के – सामंत यांच्यासह लोककला महोत्सव समिती प्रमुख ॲड. शैलेश गोजमगुंडे, प्रमुख कार्यवाह सतीश लोटके, कार्याध्यक्ष राजीव तुलालवार, उपाध्यक्ष दीपा क्षीरसागर, कोषाध्यक्ष दीपक रेगे, असिफ अन्सारी, अनंत जोशी, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.