भावना-सिद्धूच्या लग्नावर शिक्कामोर्तब गाडे पाटलांच्या घरात नवा अध्याय सुरू…

मुंबई: झी मराठीवरील महामालिका ‘लक्ष्मी निवास’ लाँच झाल्यापासून प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कथानक सध्या अत्यंत नाट्यमय वळणावर पोहोचलं आहे. भावना आणि सिद्धूच्या लग्नामुळे गावात आणि गाडे पाटलांच्या घरात वेगवेगळ्या घडामोडी घडत असतानाच या लग्नाचा भव्य सोहळा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुरुवातीला विरोध झाला असला तरी पक्षाच्या दबावामुळे गाडे पाटलांना अखेर लग्नासाठी संमती द्यावी लागली. सिद्धू म्हणजे गाडेपाटलांचा लाडका राजकुमार आणि त्याचं लग्नही तेव्हढ्याच थाटात होणार, यात काही शंका नाही . मालिकेत सिद्धूची घोडीवर दमदार एन्ट्री, ब्रास बँडचा गाजावाजा आणि साऱ्या गावाचा उत्साह दाखवण्यात आला आहे. पण या सुंदर दृश्यामागे संपूर्ण युनिटची अफाट मेहनत लपलेली आहे. पावसाळ्यात हे शुटिंग पार पडल्यामुळे वेळोवेळी पाऊस अडथळा ठरला. जसं शुटिंग सुरू व्हायचं, तसंच पावसाची संततधार सुरू व्हायची, त्यामुळे पुन्हा पुन्हा चित्रीकरण थांबवावं लागलं. परंतु सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांनी मिळून जिद्दीने तब्बल १० तासं या वरातीचं शूट केलं. प्रेक्षकांसमोर दृश्य जसं रंगतदार दिसतं, तसं ते पडद्यामागे घडवण्यासाठी खूप संयम, तयारी आणि समन्वय लागतो. लग्नाच्या जवळपास प्रत्येक सीनमध्ये एकाच वेळी २५-३० कलाकार, ब्रास बँड, घोडा, सजावट आणि इतर टेक्निकल गोष्टी हाताळणं हे युनिटसाठी मोठं आव्हान ठरलं. पण शेवटी म्हणतात ना ज्या जन्मगाठी स्वर्गात बांधल्या जातात, त्या कोणत्याही अडथळ्यामुळे तुटत नाहीत! भावना-सिद्धूचं हे लग्न त्याचं प्रतीक ठरलं.

हे लग्न म्हणजे नात्यांमधील गुंतागुंत, राजकीय दबाव आणि सामाजिक प्रतिष्ठेचा संगम असून ही मालिका पुढे काय वळण घेते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८ वाजता सदैव आपल्या झी मराठीवर.