बदलापूर: जिल्हा परिषद शाळा, मांडवणे येथील विद्यार्थ्यांना पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने वह्या, स्कूल बॅग, कंपास, खाऊ तसेच शाळेसाठी कपाट, पंखे, खुर्च्या, गरीब महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम २३ फेब्रुवारी २०२५ला पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आरसीएफचे व्यवस्थापक प्रदीप लोखंडे यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतलेले चटकन समजते, आकलन होते. अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले, त्यांचे पुढे काही अडले नाही; त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमांच्या शाळांतून शिकवावे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी विचारमंचावर सारस्वत बँकेचे शाखा प्रबंधक प्रकाश भोसले, ब्रेल लिपीतील पुस्तकांचे लेखक पत्रकार राजेंद्र घरत, मांडवणे ग्रामपंचायत सरपंच रंजना सावंत, उपसरपंच प्रकाश भालेराव, पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड उपस्थित होते. पंचरत्न मित्र मंडळाने नेहमीच दुर्गम भागातील शैक्षणिक संस्थांसाठी मदतकार्यात मोठी आघाडी घेतली असून या शाळेतील मुलामुलींनीही शिकून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाजऋणातून उतराई व्हावे असे आवाहन यावेळी राजेंद्र घरत यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, परिसरातील शाळांमधील शिक्षक, गावातील पालकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, देशभवतीपर गीत सादर केले. गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालनाची बाजू सुशील मिस्त्री यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैभव घरत, पुरु पाठसावगीकर, प्रदीप म्हात्रे, वैभव भाटिया, तुकाराम वने, डी.एस.मिश्रा, सचिन राखाडे, मॅथ्यु डिसोजा आदिंनी परिश्रम घेतले.