रंगभूमीला बालनाट्याची परंपरा आहे.मुलांना सकस आणि मनोरंजन दिले तर मुले नाटकाकडे वळतील. नाटकाने मुलांची करमणूक केली पाहिजे… सुट्टीत मुलांसह पालकांची पावलेही रंगभूमीकडे येत असून मुले बालनाट्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत. मुलांचे भावविश्व, निरागस हास्य, चेहऱ्यावरचे कुतुहूल हे सर्व जेव्हा बालपणात घेऊन जाते, तेव्हा पालकही लहानपणाच्या आठवणीत हरखून जातात. डिजिटल बालनाट्य एक वेगळा प्रयोग ‘नाटू नाटू, जादूचा दिवा हिमगौरी आणि सात बुटके’च्या निमित्ताने बालरंगभूमीवर दिसत आहे. नाटकाचे दिग्दर्शक प्रा. मंदार टिल्लू ,लेखक रत्नाकर मतकरी आणि जयेश मेस्त्री असून गंधार निर्मित श्रीगणेश प्रॉडक्शन्स प्रकाशित हे बालनाट्य आहे.
डिजिटल बालनाट्यामध्ये नाटू नाटू, जादूचा दिवा, हिमगौरी आणि सात बुटके अशी तीन नाटके आहेत. नाटू नाटूमध्ये राजा, राणी, प्रधान यांनी मनोरंजन केले आहे. जादूचा दिवा नाट्यामध्ये घरातील मुलगा हा आपली स्वप्ने रंगवत असतो. कुटुंबातील अभ्यासासह सर्व कामे करणारा हा मुलगा दाखवला आहे. जो की आपणही लहानपणी अनुभवलेला जाणवतो. त्यामध्ये सर्व कामे त्यांनीच करावीत, तसेच त्याच्याकडून पालकांच्या अपेक्षा किती आहे, याचे वास्तव मांडले आहे. आपणच सर्व कामे करू शकतो, कौन बनेगा करोडपती आणि स्वत: जनतेची कामे करणे, हे स्वप्न साकार होते का, शिक्षकांनी सांगितलेला निकाल, मुलगा राज्य सांभाळताना त्याच्या दिमतीला असणारी कुटुंबातील आणि परिचयातील व्यक्ती हे नाट्य अनुभवातून सभोवतालचे अंतरंग उलगडते. हिमगौरी आणि सात बुटके यांची कथा लहानपणीच्या आठवणीतील कथेसारखी प्रत्यक्ष घडताना वाटते. डिजिटल स्क्रीनवर दिसणारे सात बुटके आणि चेटकीण जेव्हा प्रेक्षकांमधून रंगभूमीवर येतात, तेव्हा नाट्यगृहातील बच्चे मंडळी आणि पालक कुतूहल आणि आनंदाने गुंतून जातात. हीम गौरी, सात बुटके, राजा, चेटकीण आणि प्रधान यांनी नाट्यगृहातील लहानग्यांचा अचूक वेध घेतला आहे. तसेच संगीताच्या तालावर थिरकायला लावले. मुलांचे भावविश्व समृद्ध करत त्यांच्याच वयाची मुले बालनाट्यात असल्याने त्यांनी रंगभूमीचा आनंद मनसोक्त घेतला असल्याचे वैविध्यपूर्ण प्रसंग आणि घटनांमधून दिसते. पहिल्यांदाच मोठे सेट असण्यापेक्षा डिजिटल स्क्रीनवर केलेले सेट हा वेगळा प्रयोग नाविन्यपूर्ण वाटतो. निरागस आणि प्रामाणिक लहानग्यांच्या चेहऱ्यावरचे भाव,आनंद आणि हास्य हे डिजिटल नाट्याचे गमक म्हणावे लागेल.
बाल रंगभूमीवर स्वरा जोशी, शौनक करंबेळकर, अद्वेय टिल्लू, श्रेयस थोरात, पार्थ घाणेकर, सोहम तावरे, अरुंधती राऊत,सिमरन भोगुलकर, वेदांत जकातदार, प्रेक्षा राणे, आरुष गायकवाड, श्रेयस मगर, कृपा घुळे, क्रिती रासने, आर्या दवने, द्रुवी गावडे, मनुश्री शिंदे, श्रेया कोळी, क्षण कुलाबकर, द्रुवेश भोईर,शिव शिंदे, सार्थक ठाकूर, स्वानंदी टेंबे, शार्दुल वाघधरे, अर्णव घुले, रियान देवलकर वेदांत विधाते, जय कळसकर, वीरा कोलमकर, विराज कोलमकर यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. दिग्दर्शन सहाय्य शंकर धुलगुडे आणि सनील कुलाबकर यांचे असून संगीत वैभव पटवर्धन आणि ओंकार घैसास यांनी केले आहे. प्रकाशयोजना शितल तळपदे, रंगभूषा दत्ता भाटकर, रंगमंच व्यवस्था करीना चव्हाण, अनिकेत गाडे आणि नुपूर वाळवे यांचे आहे.
बालरंगभूमी सक्षम करण्यासाठी बालप्रेक्षक घडवण्याचा मार्मिक आणि वास्तवदर्शी प्रयत्न डिजिटल नाटकातून दिसतो. कोरोना काळात मुले डिजिटल माध्यमात गेली असली, तरी रंगभूमीकडे जाऊन नाट्यगृहात पाऊल ठेऊन मुलांचे भावनिक अंतरंग उलगडणारे डिजिटल बालनाट्याची अनुभूती मुलांसह पालकांनीही अनुभवावी. त्यासाठी नाट्यगृहात जाऊन नाटू नाटू, जादूचा दिवा, हिमगौरी आणि सात बुटके ही बालनाट्य नक्की पहा.
दिग्दर्शक : प्रा.मंदार टिल्लू
लेखक : रत्नाकर मतकरी आणि जयेश मेस्त्री
निर्माता : गंधार निर्मित आणि श्रीगणेश प्रॉडक्शन्स
– विनित शंकर मासावकर