मुंबई : मराठी व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेल्या आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित पद्मगंधा पुरस्काराने आणि सर्व वृत्तपत्राने गौरवलेल्या डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या ‘चल, एश कर ले ‘ या मराठी नाटकाची ऑस्ट्रेलियातील मराठी नाट्य मंडळाने निवड केली आहे. या आधी या मंडळाने सुप्रसिध्द नाटककार प्रा. वसंत कानेटकर, सुरेश खरे, रत्नाकर मतकरी अशा दिग्गज नाटककारांची नाटके सादर केली आहेत. यावेळी हा बहुमान डॉ. विजयकुमार देशमुख यांच्या नाटकाला मिळाला आहे. या नाटकांचे प्रयोग कॅनबेरा, सिडनी आदी ठिकाणी होणार आहेत.
‘बालपणी (गावात) खालापुरीच्या चावडीवर स्वतः लिहिलेल्या नाटूकल्या करताना कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं की मी लिहिलेले नाटक ऑस्ट्रेलियाच्या राजधानीत आणि इतर ठिकाणी सादर होईल,’ अशी भावुक प्रतिक्रिया डॉ. विजयकुमार देशमुख दिली. आतापर्यंत त्यांना काव्यलेखन – वाचन, नाट्य दिग्दर्शन, नाट्य लेखन, वादविवाद, कथा कथन, वक्तृत्व, संशोधन साठी पुरस्कार मिळाले आहेत. आता त्यांच्या नाटकाला हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.