मुंबई : एखाद्या गोष्टीचा योग जुळून येण्यासाठी तुमची त्यामागची भावनाही तितकीच तळमळीची असणे आवश्यक असते. मिळालेला वारसा हा केवळ मिरवायचा नसतो तर तो योग्यरीतीने जपत पुढच्या पिढीच्या हाती सोपवायचा ही असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून मिळालेला वारसा हा ‘राज वारसा’ ठरत आजच्या पिढीला कसा मार्गदशक ठरेल ? यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या निर्माते प्रद्योत पेंढारकर यांचा निर्मिती क्षेत्रातला प्रवास शेर शिवराज चित्रपटाने सुरु झाला. हा प्रवास योगायोगाने घडला असला तरी या वारसाकडे केवळ ‘व्यवसाय’ म्हणून न पहाता ‘अधिष्ठान’ म्हणून पाहणाऱ्या प्रद्योत यांना भविष्यात अनेक दर्जेदार आशयाच्या चित्रपटाची निर्मिती करायची आहे. याचा शुभारंभ त्यांनी केला असून वर्षाला चार उत्तम चित्रपट त्यांच्या ‘राजवारसा’ या निर्मितीसंस्थेतर्फे करण्यात येणार आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शेर शिवराज’ तसेच ‘सापळा’, ‘केस ९९’ आणि प्रदर्शनाच्या वाटेवर असणारा ‘सुभेदार’ चित्रपट त्यांच्या ‘राजवारसा’ निर्मिती संस्थेतर्फे तयार करण्यात आले आहेत. यातील ‘सापळा’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, समीर धर्माधिकारी, नेहा जोशी तर ‘केस ९९’ मध्ये अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, चिन्मय मांडलेकर, यांच्या भूमिका आहेत. सध्या एक हिंदी लघुपट, सस्पेन्स थ्रिलर आणि विनोदी चित्रपटाचे काम सुरु असल्याचे प्रद्योत सांगतात.
चित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या कुटुंबातून प्रद्योत पेंढारकर आले आहेत. प्रद्योत पेंढारकर यांनी आपल्या कामाची सुरुवात शिवकालीन युद्धकलेचे धडे देणारी प्रशिक्षण संस्था सुरु करून केली असली तरी पुढे वेगळी वाट निवडत चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ‘शेर शिवराज’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर त्यांनी चार वेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. आपल्या पदार्पणाबद्दल बोलताना प्रद्योत पेंढारकर सांगतात की, निर्मिती क्षेत्रात याचं असं काही ठरलं नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपण्यासाठी आम्ही ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’ या संस्थेतफे २०१२ पासून शिवकालीन युद्धकलेचे धडे देणारी प्रशिक्षण संस्था चालवायचो. आज पुणे-चिंचवड मध्ये त्याच्या शाखा आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे ६०० शिवकालीन शस्त्रांचा संग्रह असून त्याचे विविध ठिकाणी प्रदर्शन भरवत असतो. हा वारसा जपत असताना ‘हर हर महादेव’, आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटासाठी युद्धकलेचे धडे शिकवण्याची संधी आमच्या संस्थेला मिळाली. ही संधी आमच्यासाठी ‘राजवारसा’ च्या निर्मितीचं कारण ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं. २०२१ मध्ये लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी चित्रपट निर्मितीचा प्रस्ताव मांडताना छत्रपतींचा वारसा चित्रपट निर्मिती संस्थमार्फत पुढे नेऊ शकता येतो हा विश्वास दिला. दिग्पाल लांजेकर सारख्या अनुभवी दिग्दर्शकाचं हे म्हणणं नाकारता येणं अशक्य होत. विशेष म्हणजे माझे व्यावसायिक पार्टनर अनिल वरखडे यांची चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्याची खूप इच्छा होती आम्ही तसे प्रयत्न करत होतो पण योग जुळून येत नव्हता. अनिल वरखडे यांना लहानपणापासून चित्रपट क्षेत्राची आवड होती. या क्षेत्रातल्या मान्यवरांच्या ओळखी ही होत्या त्यामुळे कधी ना कधी या क्षेत्रात यायचं होतंच. ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या निमित्ताने ही संधी मिळाली. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या झालेल्या लढाईत अनिल वरखडे यांचे पूर्वज कोंडाजी वरखडे यांचाही सहभाग होता. आपल्या पूर्वजांचा इतिहास ‘शेर शिवराज’ चित्रपटातून मांडण्याची संधी मिळत असल्याने अनिल वरखडे आणि मी निर्मिती क्षेत्रात आलो. आम्ही शिवकालीन युद्धकलेवरती चित्रपट करणार होतो. दिग्पालच्या निमित्ताने ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या निर्मितीची संधी साधत उत्तम व्यावसायिकरित्या चित्रपट निर्मितीचा डोलारा सांभाळायचं आम्ही निश्चित केलं. आधीच्या अनेक व्यवसायांचा अनुभव यासाठी गाठीशी होता. आता वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून हा प्रवास आम्हाला यशस्वीपणे पुढे घेऊन जायचा आहे.
चित्रपटाचा विषय आमच्यापुढे आल्यावर लेखक, दिग्दर्शक अनुभवी आहे की नाही याचा विचार न करता आम्ही कथेचा विचार करतो, त्या चित्रपटाचा कंटेंट आणि दिग्दर्शकाचे व्हिजन आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. वारसा जपायचा या उद्देशाने संस्थेचे नाव ही ‘राजवारसा’ ठेवल्याचे ते सांगतात. परंतु केवळ ऐतिहासिक चित्रपट न करता चांगल्या आशयाचा, मनोरंजनाचा वेगवगळ्या कलाकृतींचा ‘राजवारसा’ पुढे नेण्याचा मानस असल्याचं निर्माते प्रद्योत पेंढारकर आवर्जून सांगतात. हा वारसा जपताना आजच्या पिढीची तंत्रज्ञानाची भाषा समजून घेऊन त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचं असल्याचं सांगताना, हा कलावारसा अधिक देदीप्यमान होणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे, हे प्रद्योत आवर्जून नमूद करतात.