मुंबई:आपल्या आईकडून कलेचा सक्षम वारसा घेऊन अभिनेत्री नयना आपटे यांनी मालिका, चित्रपट, रंगभूमी, डबिंग अशी चौफेर मुशाफिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या कर्तबगारीने यश, कीर्ती मिळवीत असताना अभिनेत्री नयना आपटे यांनी अनेक अडथळे पार केले. त्यांच्या आयुष्याचा आणि कलेचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला असून त्यांच्या या कला प्रवासाचे साक्षीदार होण्याची संधी रसिकांना मिळणार आहे ‘अमृतनयना‘ च्या रूपाने.
आपल्या समर्थ अभिनयाने आणि सुंदर गायनाने शांता आपटे यांनी रूपेरी पडद्यावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांनी त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळवली. असाधारण प्रतिभेमुळे यशाचं शिखर अगदी सहज सर करत चित्रपटाच्या इतिहासात “शांता आपटे” हे नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं गेलं. साहजिकच शांता आपटे यांची कन्या म्हटल्यावर नयना आपटे यांच्यावर तशी फार मोठी जबाबदारी होती. अभिनयाबरोबरच आपल्या कष्टाने त्यांनी शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत शिकून घेतले. त्याचप्रमाणे नृत्यशिक्षणही त्यांनी घेतले. वयाच्या चौथ्या वर्षापासून नयना आपटे यांनी मराठी, हिंदी आणि गुजराती चित्रपट व रंगाभूमीवर कामे करीत विविधांगी भूमिका साकारल्या. बदलत्या काळाप्रमाणे बदल स्वीकारत सर्व माध्यमांमध्ये टिकून राहत त्यांची वाटचाल आजही सुरूच आहे. ‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या रंगभूमीय कारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या गुणी अभिनेत्रीला मानवंदना तसेच त्यांच्या कारकीर्दीच्या सन्मानार्थ मुंबईत ‘अमृतनयना’ या विशेष सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांना विनामूल्य असणार आहे.
‘सवाईगंधर्व’ आणि ‘संस्कृती सेवा न्यास’ यांच्या विद्यमाने मुलुंड येथील कालिदास नाट्य मंदिरात शनिवार दिनांक २४ फेब्रुवारीला हा सोहळा संपन्न होणार आहे. ‘अमृतनयना’ या सोहळ्यातील कार्यक्रम तीन सत्रात रंगणार असून पहिल्या सत्रात नाट्यपदे, नाटय़प्रवेश आणि कथक नृत्य सादरीकरण होणार आहे. यात ज्येष्ठ गायक नट अरविंद पिळगावकर, पं. मुकुंद मराठे, ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, अपर्णा अपराजित, गायत्री दीक्षित, आकाश भडसावळे, अथर्व गोखले, स्वराली गर्गे, प्रवीणकुमार भारदे, मकरंद कुंडले, आदित्य पानवळकर इत्यादी कलाकारांचा सहभाग असणार आहे.
दुसर्या सत्रात नयना आपटे यांचा मान्यवरांकडून सत्कार होणार असून उपस्थित मान्यवर आणि कलाकार नयना आपटे यांच्याबद्दलचे मनोगत व्यक्त करतील. यात मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकारांचा विशेष सहभाग असेल. भारतीय अभिनेत्रींपैकी पहिले चरित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्व. शांता आपटे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि लवकरच प्रकाशित होणाऱ्या नयना आपटे यांच्या चरित्राचे मुखपृष्ठ अनावरण या प्रसंगी संपन्न होणार आहे.
तिसर्या सत्रात ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर या नयना आपटे यांची दिलखुलास मुलाखत घेणार आहेत. प्रसिद्ध वृत्त निवेदक अमेय रानडे हे या संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन करणार असून प्रकाशन कार्यक्रमाचे निवेदन तपस्या नेवे आणि व्यवस्थापन राकेश तळगावकर यांच्याकडे आहे. सायंकाळी ४.०० वाजता या अनोख्या सोहळ्यास सुरुवात होईल. विनामूल्य प्रवेशिका चार दिवस आधी नाट्यगृहात मिळतील.