नवी मुंबई : महाराष्ट्र भूषण सन्मान असो, पद्मश्री असो की जीवनगौरव पुरस्कार; हे बहुमान असून समाजासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना ते हातीपायी धड असतानाच देण्यात औचित्य आहे. मुला-सूनांनी कसेबसे व्यासपीठावर धरुन आणण्याच्या अवस्थेत कुणाला असे पुरस्कार दिले जाऊ नयेत, अशी विनंती लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांनी वाशी येथे केली. शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम या संस्थेच्या २२ जूनला साजऱ्या झालेल्या तिसऱ्या वर्धापनदिनी घरत यांना ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार प्रा. प्रविण दवणे, साहित्यिक निवेदक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक गौरवण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रसंगी विचारमंचावर साहित्य मंदिरचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, समाजसेवक परशुराम ठाकूर हेही उपस्थित होते.
१ मे २००७ ला ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व माजी सनदी अधिकारी रावसाहेब रामराव पाटील यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला व वयाच्या ९९ व्या वर्षी ते १ जून २००७ रोजी हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच निधन पावले. इतकी वर्षे त्यांना हा सन्मान देण्यास झालेला विलंब अक्षम्य असून ती त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची चेष्टा असल्याचे मत यावेळी घरत यांनी मांडले. आयुष्याची किमान तीस वर्षे एखाद्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यावर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो ही आपली धारणा असल्याने वयाच्या ६३व्या वर्षात आपण हा पुरस्कार स्वीकारत असल्याची भावना घरत यांनी व्यक्त करत शिवतुतारी प्रतिष्ठानचे प्रा. रवींद्र पाटील व त्यांच्या सर्व चमूचे आभार मानले. शाल, सन्मानपत्र, शिवमुद्रा, सुंदरसे नॅपकीन गुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या प्रसंगी प्रा. प्रविण दवणे यांची सुरेख मुलाखत नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे यांनी घेतली. मागील वर्धापनदिन सोहळ्याचे अध्यक्ष अरुण म्हात्रे यांनी प्रा. दवणे यांच्याकडे यंदाच्या सोहळ्याची सूत्रे संतशिरोमणी तुकारामांच्या गाथेच्या माध्यमातून सोपवली. सत्कारमूर्ती व पाहुण्यांना देण्यात आलेल्या सुरेख सन्मानपत्रांचे रेखाटन ज्येष्ठ सुलेखनकार विलास समेळ यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रवींद्र पाटील यांनी केले. प्रा. शंकर गोपाळे व नारायण लांडगे यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली. बालकवी-कवयित्री व निमंत्रित कवींचेही संमेलन यावेळी पार पडले.