दादरमध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं ‘शिवप्रताप’ नाटकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना…

मुंबई: दादरची शारदाश्रम विद्यामंदिर मराठी प्राथमिक शाळा आणि प्रवीण विनया राणे निर्मिती यांच्या वतीनं ‘शिवजयंती’च्या निमित्ताने ‘शिवप्रताप’ नाटकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. विनया एंटरटेनमेंट प्रस्तुत, प्रविण विनया विजय राणे निर्मित आणि दिग्दर्शित ऐतिहासिक ‘शिवप्रताप’ या नाटकाचा गुरुवारी दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ला सकाळी ११:०० वाजता श्री शिवाजी नाटय मंदिर दादर येथे नाटय प्रयोगाचे आयोजन केले आहे. शारदाश्रम विद्या मंदिराचे मूळ उद्दिष्ट आहे आपली ‘माय मराठी मातृभाषा’ ही अबाधित राहावी, मराठी शाळांचे भविष्य उज्वल व्हावे, त्याचप्रमाणे मराठी शाळा हे अशा प्रकारचे उपक्रम राबवून आपला इतिहास चालत्या बोलत्या स्वरूपात आपल्या मुलांना कोणत्या प्रकारे दाखवतात हे या नाटकातून दाखवलेले मूर्तिमंत उदाहरणच आहे. शारदाश्रम शाळेत दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ ला पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती सांगितली. यावेळी संस्थेचे पदाधिकारी चंद्रकांत रसाळ, मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर, ज्येष्ठ शिक्षक कांचन खरात आणि राजेंद्र घाडगे, शिक्षक विकास धात्रक संतोष पाटील आणि आरती राजाध्यक्ष आणि अभिनेत्री श्रुती परब – लाड उपस्थित होते.

आता मराठी भाषेला ‘अभिजात मराठी’चा दर्जा मिळाल्यामुळे मराठी शाळा टिकाव्यात जास्तीत जास्त मुलांनी आपल्या मायबोली मराठी भाषेकडे वळावे आणि पालकांनी मराठी शाळांना प्राधान्य द्यावं. या नाटकासोबतच शाळेचे अनेक निरनिराळे उपक्रम होत असतात. सांस्कृतिक कार्यक्रमात दादरमध्ये ही शाळा नेहमी अग्रेसर असते. त्याचप्रमाणे या शाळेतून भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेते विजय निकम, अभिनेता सुशांत शेलार असे अनेक कलाकार घडले आहेत आणि या शाळेला या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा सार्थ अभिमान आहे, असे ज्येष्ठ शिक्षिका कांचन खरात यांनी सांगितले. या शाळेत जास्तीत जास्त मराठी मुलांनी प्रवेश घेऊन या शाळेचे भवितव्य उत्तुंग होण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध राहू, असे शिक्षकांनी पत्रकार परिषदेतून आवाहन केले.

शिवाजी मंदिर येथे दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ला होणाऱा नाट्य प्रयोग हा खरोखरच पाहण्यासारखा सोहळा आहे आणि शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या नाटकात तब्बल ४५ भूमिका महिला साकारत असून या नाटकाबद्दल एक वेगळेच आकर्षण आणि विशेष कुतूहल शिक्षक आणि पालकांच्या मनात आहे.