भारताने जगाला असंख्य देणग्या दिलेल्या आहेत, त्यातील एक म्हणजे मल्लखांब… – उदय देशपांडे

मुंबई:जुहूसारख्या परिसरात सर्वसामान्य आणि गरीब, श्रमजीवीवस्त्यांमधील मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षणातून राष्ट्रभक्तीची भावना विकसित करण्याचे काम उपनगर शिक्षण मंडळ अव्याहतपणे करीत आहे. लक्ष्मीपतिचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यानिधी विद्यालयात १४जूनला माधुरीबेन मनसुखलाल वसा सभागृहात प्लान अँन्ड लन्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्राय स्वाहा या संकल्पनेतून व वंचितांना शिक्षण या हेतुने संस्थापक स्व.श्रीराम मंत्री यांनी विद्यानिधी शैक्षणिक संकुलाची स्थापना केली.१९५६पासून प्लान अँन्ड लन्च या वैचारिक कार्यक्रमाचे अखंडपणे आयोजन केले जात आहे. स्व.श्रीराम मंत्री यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे.या निमित्ताने शैक्षणिक संकुलात ‘वंदनीय भारत,विरासत से विकास’ या संकल्पनेवर पूर्ण वर्षभरात विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ध्रुव-तारा या बालवाटिकांचे नुतनीकरणानंतर उद्घाटन पद्मश्री उदय देशपांडे व अंधेरी पश्चिम विभागाचे आमदार अमित साटम यांच्या हस्ते करण्यात आले. ध्रुव -तारा या बालवाटिकांचे नुतनीकरण आमदार अमित साटम यांच्या सहयोगातून करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांची प्रकट मुलाखत सुजाता मराठे यांनी घेतली. भारताने जगाला असंख्य देणग्या दिलेल्या आहेत, त्यातील एक म्हणजे मल्लखांब. समाज पूरक घटना आपण समाज मनात रुजवल्या पाहिजेत. विद्यानिधी शैक्षणिक संकुलात दिल्या जाणाऱ्या भारतीय संस्कारांविषयी त्यांनी कौतुक केले. स्व. श्रीराम मंत्री म्हणजे ऋषितुल्य व्यक्तिमत्व अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना श्रीराम मंत्री उत्कृष्टता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपाध्यक्ष रमेश भाई मेहता यांनी स्व. श्रीराम मंत्री यांच्या निस्वार्थी, सेवाभावी राष्ट्रभक्ती व शैक्षणिक कार्याची ओळख करून दिली. निरव देसाई यांनी नेतृत्व विकास या विषयावर कृतीयुक्त प्रात्यक्षिके घेऊन सर्वांशी सुसंवाद साधला. या कार्यक्रमाला उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण काबरा, उपाध्यक्ष रमेश भाई मेहता ,कार्याध्यक्ष संजीव मंत्री ,सचिव डॉ. साधना मोढ, कोषाध्यक्ष विनायक दामले व आजीव सदस्य तसेच शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन निलम प्रभू आणि सतीश दुबे यांनी केले.