व्यंगचित्रकारांची पिढी घडवणारे बाळासाहेब ठाकरे ! – दिवंगत व्यंगचित्रकार विकास सबनीस

‘विनोद करणं हा गंभीर विषय आहे. Humour is the Serious Business. आयुष्य हसतमुखाने आनंदाने जगावे, हा निसर्ग नियम आहे. एखाद्याला हसवणे हे कठीण काम आहे, हे काम सोपं फक्त हाडाचा व्यंगचित्रकारच करु शकतो. याविषयी सांगताहेत आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रकार विकास लक्ष्मण सबनीस…

Vikas
व्यंगचित्रकार विकास सबनीस
  • लहानपणी काय व्हायचे ठरवले होते आणि त्यानंतरचा प्रवास कसा झाला ?
    • ‘लहानपणी मी वैमानिक होण्याचा विचार केला होता. परंतु तेव्हाच माझ्या लक्षात आले की हा माझा प्रांत नाही. तेव्हाच मी आकाशातून जमिनीवर स्थिरावलो. शाळेत असताना भाषा आणि चित्रकला या विषयात फार हुशार होतो. शालांत परीक्षेनंतर मुंबईच्या जमशेदजी जीजीभाई उपयोजित कला संस्था (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट)मधून जी.डी. आर्ट (कॉम.) ही पदविका संपादन केली. महाविद्यालयात असताना शिक्षकांना माझ्यातला कलाकार कधी कळालाच नाही. वर्गात बसून कशाला आई वडिलांचे पैसे फुकट घालवतो? शिक्षकांच्या अशा टोमण्यांना सामोरे जावे लागत असे. आर. के. लक्ष्मणसारखं तुला कार्टुन काढता येणार नाही. अशाप्रकारे मित्रमंडळी टिंगल उडवायचे. याचे मनातून फार दुःख व्हायचे, मित्रांना आपल्यातला कलाकार कळत कसं नाही, याचे फार वाईट वाटायचे. या काळातील दिनक्रम महाविद्यालयात उपस्थिती लावून देवानंद यांचे चित्रपट पहायचो. घरी आल्यावर स्वतंत्रपणे व्यंगचित्राची पध्दत (स्टाईल) अभ्यासणे. अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यंगचित्राचा अभ्यास सुरु होता.’
  • आपली व्यंगचित्रांशी ओळख कशी झाली ?
    • आम्ही बाळासाहेबांची व्यंगचित्रे पाहत पाहत मोठे झालो. बाळासाहेबांना भेटण्यापूर्वी त्यांची व्यंगचित्रे आम्हाला भेटली. मी शाळेत असताना बाळासाहेब नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्र काढत होते. म्हणून ज्या ज्या वेळी मला नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल बघायला मिळत असे. त्या त्या वेळी मी बाळासाहेबांची पहिल्या पानावरील व्यंगचित्रे पाहून फार प्रभावित होत असे. त्या वयात व्यंगचित्र काय हे मला माहित नव्हते. काहीतरी अतिशय सुरेख दर्जेदार रेखाटन करतात, एवढं मात्र माझ्या लक्षात आलं होत. व्यंगचित्रातील तत्कालीन राजकीय नेत्यांचे चेहरे परिचित असल्यामुळे जवाहरलाल नेहरू ,राजाजी, जगजीवन राम, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण ते पाहिल्यावर मला वाटत असे, किती चित्तवेधक कला (Interesting Art)आहे. इतक्या सुंदर पद्धतीने चित्रकला कशी करत असतील, असा प्रश्न मला पडत असे आणि त्याच कालावधीत बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचे बीज माझ्यात रोवले गेले.
  • पहिले व्यंगचित्र कधी आणि कसे प्रसिद्ध झाले ?
    • माझे वडील दर आठवड्याला ‘मार्मिक’साठी स्तंभलेखन करत असत. त्यावेळी बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे मार्मिकचे संपादन व्यवस्थापन पाहत असत. नुकतीच शिवसेना निघाल्यामुळे बाळासाहेबांनी पूर्णपणे स्वत:ला पक्ष कार्यात वाहून घेतले होते. त्यामुळे पूर्वीसारखा व्यंगचित्रे काढण्यासाठी बाळासाहेबांना वेळ मिळत नव्हता. एकदा प्रबोधनकारांचे माझ्या वडिलांना टपालाने पत्र आले. वडील कामावर गेल्यामुळे ते घरी नव्हते. मी महाविद्यालयातून घरी आल्यावर टपालाने बाबांना आलेले पत्र वाचले.
      वडील मला म्हणाले, ‘मी रविवारी दादांना (प्रबोधनकार ठाकरे) भेटायला जाणार आहे. तू पण माझ्यासोबत चल. तु जी काही चित्रे काढली आहेस, ती सोबत घे. आपण ती दाखवून त्यांचे मत घेऊ आणि त्यानंतर पुढे कसे जायचे, बघुया.’ नुकताच त्यावेळी मी बाळासाहेबांकडून स्फूर्ती घेऊन व्यंगचित्र काढण्याचा सराव करत होतो.
      रविवारी सकाळी आठ वाजता आम्ही मातोश्रीवर गेलो. मातोश्रीवर गेल्यावर प्रबोधनकारांनी वडिलांचे स्वागत केले आणि बसायला सांगितले.
      प्रबोधनकारांनी माझ्या वडिलांना विचारले, ‘हा कोण?’
      वडिलांनी सांगितले, ‘मुलगा, जे.जे.मध्ये दुसऱ्या वर्षाला आहे.’
      दादांनी मला विचारले, ‘तुझी आवड काय आहे ?’
      ‘दादा मला व्यंगचित्र काढण्याची आवड आहे, मला व्यंगचित्रकार होण्यासाठी तुमचे मार्गदर्शन झाले, तर बरं होईल आणि मला व्यंगचित्रकार बनायचं आहे.’
      दादांनी विचारले, ‘तू काय आणले आहेस’.
      त्यांना मी काढलेली चार-पाच व्यंगचित्रे दाखवली.
      त्यांनी ती व्यंगचित्रे बारकाईने पाहिली आणि म्हणाले, ‘तु व्यंगचित्रे ब्रशने काढतो की पेनने ?’ कारण जर तु ब्रशने व्यंगचित्र काढत असशील, तर मग तुझे श्रीशी आणि बाळशी जमेल.
      (श्री म्हणजे श्रीकांत ठाकरे आणि बाळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे)
      मी म्हणालो, ‘ब्रशनेच केलेले हे काम आहे …’
      दादा म्हणाले, ‘छान’ !
      दादांनी माझी दोन चित्रे स्वत:कडे ठेवून घेतली, त्यांनी त्या दोन चित्रांवर एक कागद जोडला आणि त्यावर लिहिले, ‘मार्मिकसाठी वापरणे’ आणि त्याखाली त्यांनी स्वाक्षरी केली.
      पुढच्या आठवड्यात घरी जेव्हा मार्मिकचा अंक आला. तेव्हा त्यामध्ये वडिलांचा लेख होता. कारण ते मार्मिकमध्ये स्तंभलेखन करायचे. वडिलांचे लेखन दादांना फार आवडत असे. वडिलांच्या लेखासोबत त्या अंकात माझी दोन व्यंगचित्र प्रसिद्ध झाली. प्रबोधनकारांचे बोट धरून मार्मिकच्या माध्यमातून माझा असा व्यंगचित्राचा प्रवास सुरु झाला.

“आदरणीय लक्ष्मण सबनीस यांस,
येत्या रविवारी सकाळी आठ वाजता मला मातोश्रीवर येऊन भेटावे.

स्वाक्षरी
प्रबोधनकार ठाकरे”
  • बाळासाहेबांशी ओळख कधी आणि कशी झाली ?
    • १९६८ च्या एप्रिल महिन्यात माझी बाळासाहेबांशी व्यंगचित्रांसंदर्भातील भेट झाली. मुंबईत बाळासाहेब जुन्या घरात शिवसैनिकांना भेटण्यासाठी येत. नवीन शाखा उघडणे, नवीन सदस्य संख्या वाढवणे, इ. कामांसंदर्भात घरासमोर शिवसैनिकांची रांग लागत असे. मी तिथे जाऊन बाळासाहेबांना माझे व्यंगचित्र दाखवले. त्यांना माझे व्यंगचित्र आवडले आणि त्यांनी माझे कौतुक केले. मी एक व्यंगचित्र काढले होते त्याचे शीर्षक होते की, ‘बंडखोर ‘नाग’ चीनला मिळाले.’ नागालँडमध्ये काही लोकांनी भारताविरुद्ध बंड केले होते आणि चीनमध्ये सामील होण्यासंदर्भात त्यांची योजना सुरु होती. त्यावेळी त्या चित्रात पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते. व्यंगचित्र असे होते, ‘भारत आणि चीनच्या सीमारेषेवर बसून पंतप्रधान इंदिरा गांधी आणि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण पुंगी वाजवत बसले आहेत. ते सीमारेषेवरून पुंगी वाजवून नागाला स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना तो नाग दाद न देता चीनच्या दिशेने जात होता. बाळासाहेबांनी मला त्या नागावर ‘नागा बंडखोर’ लिहिण्यास सांगितले आणि ते व्यंगचित्र त्यांनी स्वत:कडे ठेऊन घेतले. पुढील मार्मिकच्या अंकात माझे ते व्यंगचित्र प्रसिद्ध झाले. अशाप्रकारे बाळासाहेबांच्या हस्ते माझ्या व्यंगचित्राचा ‘श्री गणेशा’ होऊन कारकिर्दीची घोडदौड सुरु झाली.
  • आपल्याकडे मार्मिकची जबाबदारी कशी आली ? त्या संधीचे सोने कसे झाले ?
    • शिवसेनेमुळे बाळासाहेबांचे काम प्रचंड वाढले होते. बाळासाहेबांनी मार्मिकचे काम जेव्हा थांबवले, तेव्हा त्यांच्या समोर प्रश्न होता की, हे काम कोण करणार, राज ठाकरेंचे नाव डोळ्यापुढे होते. बाळासाहेबांनी राज ठाकरेंना राजकारणातील काही जबाबदाऱ्या दिल्या असल्याने ते उपलब्ध होऊ शकत नव्हते. भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुखपद राज ठाकरेंकडे असल्यामुळे ते व्यस्त होते. बाळासाहेबांनी माझ्यावर मार्मिकचे मुखपृष्ठ आणि रविवारची जत्रा यांची जबाबदारी सोपवली . मार्मिकचे काम करताना बाळासाहेबांनी मला एवढे स्वातंत्र्य दिले की, मागे वळून देखील पहिले नाही. त्यांनी माझ्या कामात कधीही हस्तक्षेप केला नाही. हा बाळासाहेबांचा विशेष गुण प्रामुख्याने उल्लेख करावासा वाटतो. बाळासाहेबांच्या मार्मिकसाठी केलेल्या कामाचे भविष्यकालीन वाटचालीसाठी चीज झाले. बाळासाहेबांनी जे काम मार्मिकसाठी केले, तेच काम मी बारा वर्षे केले, ते क्षण माझ्या आयुष्यासाठी आनंददायी ठरले. बाळासाहेबांनी दिलेल्या संधीचे सोने माझ्या अप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीलादेखील होते.
  • व्यावसायिकदृष्ट्या व्यंगचित्राची सुरुवात कशी झाली ?
    • ‘व्यावसायिकदृष्टया आयुष्याला कलाटणी मिड डे या इंग्रजी वर्तमानपत्राने १९८० ला दिली. बेहराम कॉन्ट्रॅक्टर या पारशी व्यक्तीने माझ्यातला व्यंगचित्रकार धुंडाळून त्याला वाव दिला आणि तो आजतागायत आहे. त्याकाळात मराठीतील व्यंगचित्रांना मर्यादित प्रतिसाद होता. माझी व्यंगचित्रे ही आंतरराष्ट्रीय व इंग्रजी राजकारण्यांना पोषक होती. या व्यंगचित्रांना वाचकांकडून जबरदस्त प्रतिसाद…आणि ते ही मिड डेच्या पहिल्या पानावर ! व्यंगचित्रकाराला कलाप्रेमाची स्वच्छंदपणे मिळालेली ती दाद होती. अजून काय हवं असतं एका कलाकाराला !

      बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण हे गुरु ‘एकलव्य’प्रमाणे सबनीसांसमोर होते. ‘अत्यंत प्रभावी चित्र सादरीकरण व कुठलीही तडजोड न करता दर्जेदार काम हे मी बाळासाहेबांकडून शिकलो मिड डेच्या वर्धापनदिनी आर. के. लक्ष्मण आणि माझा योग जुळून आला. अतिशय जुजबी बोलणं, हा त्यांचा स्वभाव मला पहिल्या भेटीतच जाणवला. बाळासाहेब ठाकरे व आर. के. लक्ष्मण हा दुग्धशर्करा योग माझ्या जीवनाला अदभुत कलाटणी देणारा ठरला.
  • आपल्या व्यंगचित्राच्या भ्रमंतीविषयक सांगा ?
    • अमेरिकेतील अॅटलास्ट वर्ल्ड प्रेस रिव्ह्यू नियतकालीकामध्ये जगातील उत्तमोत्तम व्यंगचित्रे छापली जात असत. १९७० ला माझे व्यंगचित्र अॅटलास्ट वर्ल्ड प्रेस रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध झाले. कामाच्या निमित्ताने न्यूयॅार्क, लंडन, पॅरिस येथे वास्तव्य झाले. जर्मनीतील नियतकालिकांमध्ये पुष्कळ व्यंगचित्रांची कामे झाली. ई.पी.डी. या मॅगझिननेसुध्दा माझ्या व्यंगचित्रांची दखल घेतली. ‘ब्लिट्झ’मधील एक आठवण सांगायला आवडेल, संपादक कडक शिस्तीची करंजिया ही पारशी व्यक्ती होती. त्यांच्या कार्यालयात गेल्यावर तेथील सहसंपादकाने संपादकांच्या दालनामध्ये पाठवले, ‘सिंहाच्या पिंजऱ्यात ढकलल्यावर माणसाची जशी गत होते, तशी माझी झाली. त्यांना काही रेखाटने (स्केचेस) काढून दाखवली.’ त्यांना ती आवडली. ‘चोखंदळ संपादकाकडून व्यंगचित्रांची निवड होणे, ही माझ्यासाठी फार मोठी ध्येयप्राप्ती होती.’ मुंबई सकाळमध्ये सलग 10 ते 12 वर्षे व्यंगचित्रकार होतो. लोकसत्ता, नवशक्ती, महानगर, मिड डे, फ्री प्रेस जर्नल, इन्किलाब, द डेली, द आफ्टरनून, चित्रलेखा, लोकप्रभा, जन्मभूमी इत्यादी भाषिक आणि इंग्रजी वृत्तपत्रे, साप्ताहिके आणि नियतकालिकांमधून व्यंगचित्रांची घोडदौड यशस्वीपणे सुरु आहे. जेट एअरवेज विमान आस्थापनासाठी जाहीरातीचे मोठे काम केले. आवाज दिवाळी अंकातून सलग ३० ते ३२ वर्षांपासून ते आजपर्यंत असंख्य अंकांमधून व्यंगचित्रे प्रसिद्ध होत आहेत.

      महाराष्ट्राचे नामवंत उद्योजक श्री. शंतनुराव किर्लोस्कर, महाराष्ट्राचे राजकीय व्यंगचित्रकार श्री. बाळासाहेब ठाकरे आणि जागतिक किर्तीचे अमेरिकन व्यंगचित्रकार श्री. रॅनन ल्युरी यांच्याकडून गौरवण्यात आले. पु.ल. देशपांडे, मुंबई वृत्तपत्रलेखक संघातर्फे पुरस्कार, दिवाळी अंकाचा शं. वा. किर्लोस्कर १९९९, २००१ आणि २००५ ला सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार पुरस्कार लाभला.
  • आपल्याला बाळासाहेबांकडून कोणते ‘बाळकडू’ मिळाले ?
    • व्यंगचित्रातील अतिशय उत्तम रेखाटन आणि शरीरशास्त्राचा पायाभूत अभ्यास हे बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचे गुण शिकण्यासारखे आहेत. डेविड लोच्या व्यंगचित्रातील शरीरशास्त्राची प्रतिमा बाळासाहेबांच्या चित्रांमध्ये दिसते. नेतृत्वगुण, माणसांना सोबत घेऊन पुढे वाटचाल करणे, माणसांची समस्या जाणून घेणे, माणसामध्ये कुठलाही भेद न करणे, लोकांना मदत करणे, स्वत:चे वजन एखाद्याच्या पारड्यात टाकून अडचणीतून बाहेर काढणे असे गुण बाळासाहेबांकडे उपजत होते. उत्तम दर्जाचे रेखाटन कौशल्य, भाषेवर प्रभुत्व आणि कल्पनेची भरारी हे ‘बाळकडू’ बाळासाहेबांकडून आम्हाला मिळाले.

      बाळासाहेबांशी भेट आणि चर्चा होत असताना ते राज ठाकरेंना आणि मला काही सूचना करत असत. त्यावेळी आम्ही लक्षपूर्वक ऐकत असू आणि आमच्या व्यंगचित्रांमध्ये त्या सूचनांची अंमलबजावणी करत असू. बाळासाहेबांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाने आमचा ‘विकास’ होण्यास मदत झाली. बाळासाहेबांच्या कुंचल्यातील फटकाऱ्यांनी आमच्या कामावर सकारात्मक परिणाम केला. आज जे काही माझ्या व्यंगचित्रकलेतील कौशल्य आहे, ते बाळासाहेबांमुळेच !

      आमच्या व्यंगचित्रांची पिढी बाळासाहेबांचा कित्ता गिरवत घडली. आमच्याकडे जी चित्रकलेची बैठक आणि कल्पनेची भरारी आहे ती बाळासाहेबांमुळे आहे. असे मला मुद्दाम नमूद करावेसे वाटते. बाळासाहेबांच्या भेटीच्या वेळी जेव्हा ते आमच्याशी बोलत, तेव्हा ती आमच्यासाठी “व्यंगचित्राची कार्यशाळा” असे.

      बाळासाहेब संपादक आणि आम्ही व्यंगचित्रकार असणे, हा आमच्यासाठी सन्मानाचा भाग होता, आमच्या व्यंगचित्रांमध्ये बाळासाहेबांचे मोलाचे योगदान आहे.
  • आपण व्यंगचित्राबाबत तरुणांना काय मार्गदर्शन कराल ?
    • तरुणांनी द्विमितीय (2D) आणि त्रिमितीय (3D) कडे वळले पाहिजे. माहिती तंत्रज्ञानामुळे तरुणांना ‘गो फॅार अॅनिमेशन’ची वाट चोखाळावी. भुतकाळात माणसाच्या नैपुण्याला मोल होते, तर वर्तमानकाळात प्रगत तंत्रज्ञानाला किंमत आहे.

      ‘हम दोनो’ या हिंदी चित्रपटातील ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में उडाता चला गया…’ हे आयुष्यातील मर्म सांगणाऱ्या गाण्यावर व्यंगचित्रकार विकास सबनीस यांनी जीवनप्रवास केला. व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे निधन २७ डिसेंबर २०१९ ला झाले.