मुंबई:’न्यायमूर्ती काही वर्षांपुर्वी आपल्यावरील दबावाविरोधात आंदोलनाला बसले होते, खाजगी डॉक्टर्स आपल्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरले तसेच लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने आपल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक मानसिक सुरक्षा व हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. पत्रकारांसाठी धोरण ,महामंडळ किंवा आयोग तातडीने महाराष्ट्रात तयार होण्याची गरज आहे, मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाची ही मागणी रास्त आहे. निवेदने देऊनही सरकार ऐकत नसेल तर इतर सनदशीर मार्ग आहेतच. आजच्या घडीला देश व राज्यासाठी माध्यमे व न्याय हे दोन स्तंभच मोठे योगदान देऊ शकतात,’असे स्पष्ट मत ज्येष्ठ विधिज्ञ एड नीतीन सातपुते यांनी व्यक्त केले.
मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) वतीने चौथ्या स्तंभाच्या हक्क व सन्मानासाठी मुक्त संवाद आयोजित करण्यात आला होता. मुंबईत नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्राच्या ऋणानुबंध सभागृहात ‘पत्रकार..माध्यमे आणि वर्तमान आव्हाने’ या मुक्त संवादात ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, किशोर आपटे ,चेतन काशीकर आणि ज्येष्ठ विधिज्ञ नितीन सातपुते यांनी आपल्या भूमिका मांडून बदलती पत्रकारिता आणि पत्रकारांच्या समस्या यावर मोकळ्या पणाने आपले विचार मांडले.मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) च्या पुढाकाराने १ ला देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी म्हणाले की,’प्रसार माध्यमांना स्वातंत्र्य द्या, प्रत्येकाला कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव आहे. त्याच्यावर सरकारने विश्वास ठेवावा. प्रत्येक पत्रकाराला अधिस्विकृती कार्ड द्या, तसेच पत्रकारांना पेन्शन नाही पण पेन्शन ऐवजी देण्यात येणारी सन्मान योजना सन्मानाने द्यावी. आजवर पत्रकार हितासाठी होणाऱ्या सरकारी अक्षम्य दिरंगाईबद्दल ताशेरे ओढले. तसेच माईने केलेली पत्रकार महामंडळाची मागणी रास्त आहे,ज्या सरकारपुढे लोटांगण घालणाऱ्या संघटना वगळून इतर संघटनांना सोबत घेऊन यासाठी काम करावे. ‘
किशोर आपटे यांनी सांगितले की, ‘मंत्रालय आणि विधिमंडळ कव्हरेज करताना २०१४ नंतर जे बदल होत गेले ते पत्रकारितेसाठी योग्य नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ‘गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या तशीच परिस्थिती झाली आहे. पत्रकार कोणाला बोलायचे ?याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडे ठोस असे काहीही नाही, सलग ३० वर्ष पत्रकारिता केलेल्या पत्रकाराला पेन्शन लागू मात्र, त्यात जाचक अटी असल्याने पेन्शन लागू होत नाही, पत्रकारांसाठीची योजना म्हणजे गाजर आहे.’
चेतन काशीकर यांनी ‘जेष्ठ पत्रकारांना होणारा त्रास तसेच नवीन पत्रकारांना तुटपुंज्या मानधनात करावी लागणारी पत्रकारिता, किमान वेतन न देता जाहिराती आणा, यासाठी व्यवस्थापनाने लावलेला तगादा मोकळेपणाने मांडला. बदलत्या काळाप्रमाणे बदलत्या माध्यमांना तंत्रविज्ञानाने एक वेगळे वळण देण्यात येत आहे . कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेचआर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) इतका धोकादायक आहे की कोणाचाही क्लोन बनवून कुठचाही माणूस उभा करू शकतो आणि त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या काही पत्रकारांवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यात मुख्य म्हणजे येणारा नवीन कायदा हा त्यांना अतिशय वेगळ्या वळणावरती येऊन ठेवेल याकरिता सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन ठोस पावले उचलली पाहिजे असेही त्यांनी सांगितले
माईच्या संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी सांगितले की, ‘पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत, यासाठी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया सर्वोतोपरी चाम करणार, माध्यम कर्मचाऱ्यांसाठी सरकारने महामंडळ वा आयोग गठीत केल्यास त्यामाध्यमातून पत्रकार व सर्व माध्यम कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन, मेडिकल सुविधा मिळाव्यात तसेच नवीन पत्रकारांना किमान वेतन आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी खंबीरपणे कार्य करणार आहोत.मीडियाचे धोरण असायलाच हवे! मराठी वर्तमानपत्राच्या जाहिराती कमी इंग्रजीला जास्त. दोघांच्या दरात मोठा फरक आहे तरीही मराठीला कमीपणा का? हे कोण व का करते आहे. अंत्योदय हितासाठी छोट्या व मध्यम नियतकालिकांना ताकद देणे अत्यावश्यक आहे. जे फक्त पत्रकारितेवर आपलं पोट भरतात अशांना पत्रकार म्हणून ओळख देणं ही सरकारची जबाबदारी आहे. माध्यमांच्या मालकांच्या एकूण कमाईवर माध्यमात काम करणाऱ्यांचे वेतन वाढायला हवे. १ जुलैपासून अंमलबजावणी होणाऱ्या सोशल मीडियासाठीच्या कायद्याचा धोका माध्यमकर्मीना होऊ शकतो त्यासाठी आम्ही पत्रकार व कायदेतज्ज्ञ मिळून काम करणार आहोत. महाराष्ट्र सरकारने यासाठी इच्छाशक्ती करायला हवी.’
कार्यक्रमाचे आयोजन माईचे मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस यांनी केले तर सह संघटक सचिव अनिल चासकर तसेच सांगलीचे संघटन सचिव लक्ष्मण खटके यांनी प्रमुख वक्ते व मान्यवरांचा शाल श्रीफळ व मोठ्या पुष्पहाराने स्वागत केले. संभाजीनगरचे संस्थापक, संघटक डाॅ.अब्दुल कादिर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या यशवंतराव चव्हाण केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले व व्यवस्थापकीय पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच छत्रपती फाऊंडेशनचे भारत शिंदे यांचे आणि सर्व वक्ते उपस्थित माध्यम कर्मीचे आभार मानले. माईचे संस्थापक सरचिटणीस कोल्हापूरचे डाॅ.सुभाष सामंत यांनी कार्यक्रमाला माईचे शेखर धोंगडे, सुनिल कटेकर, प्रविण वाघमारे, अविनाश धुमाळ, आदी पदाधिकारी सुरज खरटमल, गणेश तळेकर, गणेश गारगोटे, राम कोंडिलकर, मंदार जोशी, वैभव बागकर, विनित मासावकर आदी माध्यमकर्मी उपस्थित होते.