मुंबई:हल्लीच ‘तुला जपणार आहे’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आणि प्रोमो पाहून नेटिजेन्समध्ये चर्चा सुरु झाली, की दूरचित्रवाणीवर काही तरी वेगळं पहायला मिळणार आहे. एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि एक आई तिथे असूनही तिची मदत करू शकत नाही. पण तिकडे एक तरुणी येते आणि विचार न करता पाण्यात उडी मारते आणि लहान मुलीला वाचवते. हे दिसत तितकं सोपं नाही हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. या प्रोमो मध्ये जीने त्या लहान मुलीचा जीव वाचवला म्हणजेच मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेने प्रोमो शूटचा किस्सा ऐकवला. ‘मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण प्रोमो मधे वेदा पाण्यात पडते हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास १३ – १४ फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून त्यात चेहऱ्याचे हावभाव दाखवणं कठीण होत. जेव्हा आम्ही रिहर्सल केली त्यावेळी माझ्या अंगावर ६ किलो वजन बांधल होत. शूटच्या दिवशी मी जवळपास ११-१२ तास पाण्यात होते. हिवाळा असल्यामुळे प्रचंड थंडी होती. जेव्हा शूट पूर्ण झालं तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केलं अस जाणवलं. त्या दिवसानंतर मी आजारी पडले, पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शूटिंगसाठी गेले माझ्यात ते बळ कुठून आलं याची मला कल्पना नाही. आता जेव्हा हा प्रोमो पाहते तेव्हा खूप आनंद होतो आणि मेहनतीच चीज झाल याचा प्रत्यय येतो.’
मायेची साद जेव्हा देवी ऐकते तेव्हा फक्त संरक्षण नाही तर चमत्कार घडतो अशी ही गोष्ट, प्रत्येक आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या भावनांची गोष्ट! ‘तुला जपणार आहे’ १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.