मडगाव: महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो-खो संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपापल्या गटामध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा मान पटकावला. त्यामुळे महाराष्ट्राला खो-खोमध्ये दोन सुवर्णपदके आपल्या नावे करता आली. त्यादरम्यान क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र खो-खो संघाचे खास कौतुक केले. त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी खो-खो खेळात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पारंपारिक खेळात आपला दबदबा कायम ठेवता आला, अशा शब्दात त्यांनी संघाचे खास कौतुक केले.
महाराष्ट्र खो-खो संघांनी गतवर्षी गुजरातमध्ये ही सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला होता. यात सोनेरी यशाला पुन्हा एकदा उजाळा देत महाराष्ट्राचे दोन्ही संघ गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किताब विजयी ठरले. महाराष्ट्र पुरुष संघातील खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे संघाला किताबाचा पल्ला गाठता आला. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू सहभागी असलेल्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले.
खो-खो संघाची कामगिरी प्रेरणादायी – संजय बनसोडे
‘सलग दुसऱ्या वर्षी सोनेरी या संपादन करत महाराष्ट्र खो-खो संघाची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. यामुळे निश्चितच राज्यातील इतर युवा संघांनाही यातून प्रोत्साहन मिळणार आहे. खेळाडूने स्पर्धेत सर्वोत्तम यश संपादन करत आपली नवीन ओळख निर्माण केली आहे,’ असे राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
खो-खो संघाची कामगिरी उल्लेखनीय – नामदेव शिरगावकर
‘खो-खो या पारंपरिक क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्र महिला आणि पुरुष संघांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला या क्रीडा प्रकारात किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. दोन्ही संघातील खेळाडूंची कामगिरी कौतुकास्पद ठरली,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केली.