मुंबई: मराठी संस्कृतीचा वारसा जपत नावीन्यपूर्ण कार्यक्रम देण्याचा प्रयत्न सोनी मराठी वाहिनी नेहमीच करत आली आहे. ही परंपरा कायम ठेवत भक्ती आणि मनोरंजन यांचा मिलाफ सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा साधणार आहे. महाराष्ट्राने तलवारीच्या बळावर जगाला काबीज केलं आणि भक्तीच्या मार्गाने जगाला दिशा दाखवली. महाराष्ट्राच्या या जडणघडणीत वारकरी संतांचा मोठा हातभार आहे. संतांचे विचार त्यांच्या अभंगातून कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मातीत एकरूप झाले. त्यामुळे या मातीत एकापेक्षा एक कीर्तनकार निर्माण झाले. कीर्तनकारांची ही भव्य परंपरा समृद्ध करण्यासाठी सोनी मराठीवर सुरु होतंय अद्भुत शोधपर्व ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’. या रिअॅलिटी शोच्या शीर्षकगीतानं शोची उत्सुकता आधीच वाढवली आहे.
रिअॅलिटी शो म्हटलं की परीक्षकांविषयी उत्सुकता असते. त्यातही कीर्तनासारखा आगळावेगळा रिअॅलिटी शो म्हटल्यावर त्यातल्या परीक्षकांविषयी चर्चा नि उत्सुकता थोडी अधिकच आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातून १०८ कीर्तनकार सोनी मराठीने शोधून आणले आहेत. प्रत्येक भागात त्यापैकी ३ कीर्तनकार चक्री कीर्तनाच्या पद्धतीने त्यांची कीर्तन सेवा सादर करतील. या सर्व कीर्तनकारांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोनी मराठीने संप्रदायातील या दोन दिग्गज कीर्तनकार हभप जगन्नाथ महाराज पाटील आणि हभप राधाताई महाराज सानप यांच्यावर सोपविली आहे.
अत्यंत अभ्यासू कीर्तनकार ह.भ.प. राधाताई सानप या कर्तृत्वान आणि प्रतिभावान असून त्या सांप्रदायिक कीर्तनं, स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबंदी अशा शैक्षणिक, सामाजिक व इतर विषयांवर प्रबोधन करून समाजजागृतीचं काम करतात. ह. भ. प. जगन्नाथ महाराज पाटील अनेक सामाजिक प्रश्नांवर भाष्य करतात. भक्ती अन् मनोरंजन यांचा अनोखा मिलाफ साधत अभ्यास, बोलण्याची प्रभावी शैली, ग्रामीण भाषेचा लहेजा, हजरजबाबीपणा यांमुळे महाराष्ट्रभरात त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमांना भाविक आवर्जून उपस्थित राहतात.
वर्तमानातल्या घडामोडींचा संदर्भ देऊन सद्य परिस्थितीविषयी मार्मिक भाष्य करत आपल्या निरुपणातून अंजन आणि रंजन अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारे हे दोन परीक्षक कार्यक्रमात उदयोन्मुख कीर्तनकारांना मार्गदर्शन करणार आहेत. दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदाच कीर्तनकारांवर आधारित रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासाठीच्या ऑडिशन्स नुकत्याच पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या स्पर्धकांनी या ऑडिशन्सना भरघोस प्रतिसाद दिला. या कीर्तनकारांना पैलू पाडण्याचं कार्य परीक्षक पार पाडणार आहेत. या कीर्तनकारांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कीर्तनप्रवासाचे साक्षीदार होण्याचा आनंद आम्हाला मिळणार आहे असं परीक्षक सांगतात.
परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या उदयोन्मुख कीर्तनकारांना नवी दिशा मिळेलच पण प्रेक्षकांना देखील कीर्तन म्हणजे काय.. ते कसं असावं.. कसं पहावं.. याबद्दलची मूळ माहिती घरबसल्या मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांवर सुसंस्करण घडावे याकरिता असे कार्यक्रम खरोखरीच मदतशील ठरतात. केवळ लहानगेच नाही तर सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ हा कार्क्रम भावेल, यात काहीच शंकाच नाही. चला मग विठ्ठलाच्या साक्षीने सुरु करूया हे अद्भुत शोधपर्व…’कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार…’ हा नवा रिअॅलिटी शो १ एप्रिलपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८.०० वाजता सोनी मराठीवर पहायला विसरू नका.