देवदत्त पाठक,ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ प्रशिक्षक
महाराष्ट्र राज्य हे रंगभूमी कलेचे उपासक तसेच अभ्यासक आणि प्रशंसक आणि प्रचंड प्रेम करणारे उपक्रमशील, रसिक राज्य आहे.कोट्यावधी रुपयांचा वर्षभरामधील जमाखर्च लेखाजोखा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी निरंतर उलाढाल वर्षानुवर्षे होत आहे. व्यावसायिकता, प्रायोगिकता,उपक्रमशीलता यामध्ये महाराष्ट्र राज्याचा कोणी हात धरणार नाही. नवेनवे कला प्रयोग आणि नव्या प्रयोग करण्याच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. अशाच या राज्याचा विशेषता शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धा त्याची २१ केंद्र आणि पारितोषिकांसाठी देत असलेली भरभक्कम रक्कम, यामध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाचा कोणी हात धरणार नाही. या अशा उपक्रमांमध्ये भर म्हणून अजून एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘सांस्कृतिक कार्य विभागातर्फे होणारी नाट्य शिबिरे’.
कमलाकर सोनटक्के ,वासुदेव पाळंदे, भालबा केळकर ,विजया मेहता, सई परांजपे ,विश्वास मेहंदळे यांच्यापासून आजच्या कार्यशाळा किंवा शिबिर घेण्यासाठी संचालक म्हणून, गावागावातील रंगकर्मींचा सहभाग निश्चितच वाखाण्याजोगा आहे.नाट्य शिबिर हे प्रेक्षक घडवेल, कलाकारही घडवेल आणि निर्मातेही. रंगभूमी कलेकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोनही ते देत आले आहे, देईल. त्यातूनच अनेक वेगवेगळ्या विषयावरचे अभ्यास करणारे , तसेच काम करणारे रंगकर्मी गेल्या ५० वर्षांमध्ये तयार झालेले आहेत, ही अत्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलेसाठी भरण पोषणाची आणि अभिमानाची बाब आहे.
दरवर्षी हे नाट्य शिबिर वेगवेगळ्या गावात, जिथे नाट्यकाला पुण्यामुंबईसारखी समृद्ध नाही ,पण गावागावापर्यंत पोहोचलेली आहे, तिथल्या रंगकर्मींना किंवा तिथल्या आजूबाजूच्या गावातील उपनगरातील रंगकर्मींना या नाट्य शिबिरांचा फायदा होत आहे. यामध्ये लेखन,दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य प्रकाश , रंगभूषा वेशभूषा ,संगीत, प्रकाशयोजना या रंगभूमी कला घटकांचा समावेश होत असतो. जर का दरवर्षी नव्या १० गावांमध्ये हे नाट्य शिबीर पोहोचत असेल ,तर दहा गावातील आजूबाजूचे रंगकर्मी आणि नव्या उमेदीचे, ताकदीचे, कलेवरील निष्ठावंत आणि प्रेमाचे शिलेदार , कलाकार यांना तर संधी मिळतेच. त्याचबरोबर यानिमित्ताने या सर्व विषयांवर ती व्याख्याने आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी जवळजवळ १००जणांना आपल्या कलाज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सुद्धा संधी मिळते, ही गोष्ट एका अर्थाने रंगभूमी कला सर्वदूर पोहोचवण्यासाठी तर घडतेच त्याचबरोबर ज्यांच्याकडे ज्ञान आहे आणि ज्यांना ते द्यावेसे वाटते त्यांना सुद्धा ही संधी फार मोठी आहे. प्रयोग आणि प्रशिक्षण यातून विचारांची देवाणघेवाण आणि नव्या उमेदीने कृती करण्याची जाण निर्माण होत असते हे निश्चित. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासन सांस्कृतिक कार्य विभाग त्याचे मंत्री संचालक, सहसंचालक, प्रशासकीय अधिकारी हे सर्वच जण आघाडीवर असतात. त्याच्यामागे शिबिर घेणारे संचालक आणि प्रत्येक गावचीअसलेली रंगकर्मींची नव्या जुन्यांची टीमही कार्यरत असते,ही एक अर्थाने रंगभूमी कलेबाबतची चळवळच आहे. यात अनेक वर्षांचे सातत्य ही आहे, हे महत्त्वाचं. यामध्ये लहान मुलांसाठी नाट्य शिबिरे, लोककला, हस्तकला, वादन कला, गायन, लावणी ,नर्तन कला, कीर्तन कला अशा इतर कलांचाही अंतर्भाव आहे. मोठ्यांसाठीही सर्व विषयांवरची नाट्य शिबिरे होत असतात, यामध्ये अनुभव संपन्न प्रशिक्षक, प्रशिक्षणार्थी प्रबोधन आणि ज्ञानार्जनासाठी आतुर असतात. यातूनच मराठी रंगभूमी साठी प्रगतशील आणि नव्या रंगकर्मींना पूरक आणि पोषक असे वातावरण निर्माण होताना दिसते. यामध्ये काही संशोधक, समीक्षक सुद्धा बनतात. सांस्कृतिक कार्य संचालनालयाची नाट्य शिबिरे ही तर एका अर्थाने गावात, उपनगरात असलेल्या नव्या दमाच्या कलाकारांना कला ज्ञानाची भूक भागवणारी पर्वणीच असते .
यावर्षी मार्च महिन्यात पाच नाट्य शिबिर झाली लाड, कारंजा, वाशिम सोलापूर, कराड इत्यादी गावांबरोबरच ही पाच शिबिरे, तिथल्या तिथल्या अनुभवी रंगकर्मींनी म्हणजेच श्रीकांत भाके, प्रणिता दसरे,जुगल किशोर ओझा, मीरा शेंडगे यांच्यासह अनेकांनी संचालित केली. त्यामध्ये त्या पन्नास वर्षातील काळाप्रमाणे अनेक मान्यवर व त्यांनी आपल्या रंगभूमी कलेच्या संदर्भातल्या ज्ञानाचे दान सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना आजपर्यंत केले आहे.काही ठिकाणी तर मुलांच्या परीक्षा चालू असताना सुद्धा मुलांनी आम्ही आधी हे शिबिर करणार आणि परीक्षा नंतर देणार असे सुचवले आणि त्याला तिथल्या शाळांनी, संस्थांनी मदतही केली. म्हणजेच एका अर्थाने या नाट्य शिबिरांचा महत्व किती आहे हे लक्षात येते.
पुणे, मुंबई सारख्या मेट्रो शहरांमध्ये ही गावाकडची मुलं येऊन अशा प्रकारचं रंगभूमीकलेचे ज्ञान घेण्यासाठी असमर्थ असतात ,आर्थिक दृष्ट्या ही गोष्ट परवडणारी नाही, म्हणून अशा प्रकारची शिबिरे ही मुलांना मोफत असतात, त्यांची राहण्याची खाण्याची प्रवासाची सोयही केली जाते आणि त्याचाच फायदा घेऊन त्यातूनच गावागावातून अत्यंत उत्तम दर्जाचे कलाकारही बनतात हे समोर आले आहे. आता तर ही अशी शिबिरे एप्रिल मे महिन्यामध्ये सुट्ट्यांच्या काळातही होणार आहेत. यातूनअनेक उत्तम कलाकारांची तंत्रज्ञांची नावांची यादी देता येईल ती खूपच मोठी आहे. त्यातून पुढे कलाक्षेत्रातच काही करावयाचे आहे या दृष्टीने एक ध्येय सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते, होते आणि चांगले कलाकार मिळताना चांगले प्रेक्षकही नाटकासाठी उपलब्ध होतील ,या दृष्टीने शासनाची नाट्य शिबिर आणि इतर शिबिर आहेही महत्त्वाची आहेत. ती अशीच घडत राहोत ती नुसती कमी संख्यात्मक न राहता अजून वाढली पाहिजेत. यासाठी सरकारने सुट्ट्यांचा काळ याचा अधिक विचार करून, या शिबिरांचे आयोजन वेगळ्या ठिकाणी करायला हवे आणि ते तसे करणार आहेत, याचेही सुतवाच या निमित्ताने शासनाच्या प्रतिनिधींशी बोलताना झाले.नाटक नुसते प्रयोगापुरते मर्यादित न राहता त्याची पूर्वपिठीका म्हणून रंगभूमी कलेचे शास्त्र आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या सगळ्या विषयांचा अभ्यास म्हणून त्याचे प्रशिक्षण देण्याचं काम महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय करत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यामुळे रंगभूमी कला गावात तळागाळापर्यंत पोहोचेल आणि त्यातूनच आजची रंगभूमी समृद्ध आहेच,पण उद्याची रंगभूमी अधिकाधिक श्रीमंत होईल ती नुसती धनधान्य परंपरेने नाही ,तर नवनव्या विचार कल्पनांनी अजून उच्च शिखर गाठेल असा विश्वास आहे.