मुंबई: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विद्यानिधी व्रजलाल पारेख मराठी माध्यमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृती जिवंत ठेवणारे कार्यक्रम सादर केले. गीत, नृत्य, वक्तृत्व आणि कविता गायनातून आपली कला सादर केली.विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे सुंदर गायन केले. नृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली आणि कुसुमाग्रजांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाला जाणकार वक्ते आशिष निनगुरकर ,आय.डब्ल्यू.सी. मुंबई नॉर्थ आयलंडचे अध्यक्ष सीमा बसंतानी व विजय ठाकरे उपस्थित होते. पार्ले टिळक प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका गाडे मॅडम यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रमुख वक्त्यांनी मराठी शाळेवर विश्वास ठेवल्याबद्दल पालकांचे कौतुक केले.मराठी भाषेचा वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला. वक्त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. शाळेतील शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “गर्जा महाराष्ट्र माझा” या राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.