स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींची देशभक्तीआणि प्रतिभा !

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्ही. पी. मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी दोन महत्त्वाच्या सरकारी ठिकाणी आपली प्रतिभा आणि देशभक्ती दाखवली. प्रणाली बोडेकर विद्यार्थिनीने अंधेरी महानगरपालिका कार्यालयात उत्कृष्ट वक्तृत्व कलेचे सादरीकरण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करून सर्वांचे लक्ष वेधले.

इर्लाच्या खादी भांडार येथे सुमारे ८ मुला-मुलींनी देशभक्तीपूर्ण संगीतावर मल्लखांबाचे अप्रतिम प्रात्यक्षिक दाखविले. शाळा मराठी माध्यमाची आहे, असे असून देखील त्यातीलच काही विद्यार्थ्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्यावर एक इंग्रजी नाटिका आणि वैशाली वोटकेल या विद्यार्थिनीने अस्खलित इंग्रजीतून संभाषण याने उपस्थितांचे मन जिंकले आणि शाळेची मान उंचावली.

या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून देशप्रेमाची भावना प्रभावीपणे व्यक्त केली. त्यांच्या व त्यांच्या शिक्षकांच्या या प्रयत्नांची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली. हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आणि देशभक्तीची भावना जागृत केली. विद्यानिधी मराठी माध्यमिक शाळेच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली.