पुणे: मराठी रंगभूमी दिनानिमित्त देवदत्त पाठक यांचे “नाटकाचा तास” हे इयत्ता आठवी ते दहावी साठीचे रंगमंचीय खेळांचे नवीन पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून देवदत्त प्रकाशनचे हे २३वे पुस्तक आहे. आठवी ते दहावी या किशोर मुलांच्या वागण्याच्या संदर्भातल्या तंदुरुस्तीसाठी ४० रंगमंचीय खेळांचे हे नवे पुस्तक या वयातील मुलांच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आकार देईल. त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी बनवेल. त्याचबरोबर त्यांच्या विचार, कल्पना,निरीक्षण,स्मरण,कृती आणि नवनिर्माण शक्तीला प्रेरित करेल. प्रत्यक्षात स्वतःच्या आयुष्यासाठी आणि कलेसाठी सातत्य ,कष्ट ,निष्ठा आणि नवेपणा यासाठी कशा पद्धतीने त्याचा उपयोग करता येईल हे सांगणारे “नाटकाचा तास” हे पुस्तक आहे.
किशोरवयीन गटातील मुलांसाठी खास करून यातील रंगमंचीय खेळ मुलांना नाविन्य आणि कृतीशीलता याला प्रत्यक्षात करून बघण्याची प्रेरणा देतील, आयुष्यात काय करायचे आहे आणि काय करू नये हे याची पक्की विचारधारा या निमित्ताने या पुस्तकाच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या मनात उजळून निघेल असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगभूमी अभ्यासक प्रा.देवदत्त पाठक यांनी केले आहे.
नाटकाचा तास असे या पुस्तकाचे नाव असून आजपर्यंत गेल्या तीन महिन्यात इयत्ता पहिली ते चौथी आणि ,पाचवी ते सातवी आणि आता आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी तयार झालेल्या या पुस्तकात बाल, कुमार आणि किशोर अशा वयोगटाप्रमाणे यातील रंगमंचीय खेळांचा विचार केला आहे. ज्या ज्या शाळांमध्ये नाट्य अभिव्यक्ती तासिका होऊ शकते, तिथे त्या नाटकाच्या तासासाठी सदर पुस्तक सदर तास घेण्यासाठी उपयुक्त होईल. रंगमंचीय खेळ, रंगभूमी पाठ, चर्चा, चिकित्सा ,सराव आणि प्रात्यक्षिक प्रयोग अशा प्रक्रियेतून मुलांना या तासाला घुसळून काढण्याचे कौशल्य या पुस्तकाच्या रूपाने शिक्षकांना तो तास घेण्यासाठी आत्मसात करून घेता येईल ,असे मत शालेय रंगभूमी अभ्यासक सूर्याक्ष केळकर यांनी या निमित्ताने केले आहे.
५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन याचे औचित्य साधून रंगभूमी कलेला शालेय पातळीवर एक अभ्यासक्रमीय पुस्तक म्हणून शास्त्रीय परिभाषेत मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रगत करून त्यांच्यातील वागणे तंदुरुस्त करण्यासाठी नाटकाचा तास हे पुस्तक उपयोगी पडेल. देवदत्त पाठक लिखित हे पुस्तक मराठी रंगभूमी कले च्या अभ्यासक्रमीय स्वरूपात आधुनिकता म्हणून हे पुस्तक म्हणजे पुढचा टप्पा आहे असे म्हणता येईल. सदर पुस्तकाचे प्रकाशन गुरु स्कूल गुफान मध्ये देवदत्त प्रकाशन २३ वे पुस्तक गणेश भोसले ,अक्षय खामकर ,गौरी पत्की,अर्णव देशपांडे,प्रतीक कडबाने,ऋतुजा केळकर धनश्री गवस या बाल, कुमार, किशोर, युवा विद्यार्थ्यांच्या हस्ते झाले.