मुंबई : अनेक नामवंत शाहीर रत्न महाराष्ट्राच्या मातीत झळाळून उठले आहेत. यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे शाहीर विठ्ठल उमप. आपली लोकसंगीताच्या अनुभवाची शिदोरी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून सादर करत शाहीर विठ्ठल उमप यांनी लोककलेची परंपरा जपत समाजप्रबोधनासह जनजागृतीचा प्रयत्न सातत्याने केला. लोककलेचा हा वारसा जपत ही परंपरा त्यांची मुलं अभिमानाने पुढे चालवतायेत.
पोवाडा, बहुरूपी, भारूड, भजन, गण-गवळण, लावणी, कवने, तुंबडी, बोबडी, धनगरी गीते, नंदीबैल, वासुदेव, डोंबारी, पोतराज, गोंधळी अशा अस्सल मऱ्हाटमोळ्या लोककलेच्या सर्वच कलाप्रकारांत लीलया संचार केलेल्या ‘जांभूळ आख्यानकार’ ज्यांनी गाता गाता भर कार्यक्रमात आपला देह ठेवला अशा,लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या १३व्या स्मृतीदिनानिमित्त याहीवर्षी १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा पार पडणार आहे. विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे आयोजित होणारा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला ठाणे येथे काशिनाथ घाणेकर सभागृहात संपन्न होणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. यंदा २०२३ च्या पुरस्कारांमध्ये जीवन गौरव, लोककला, सामाजिक, संगीत,अभिनय आणि नवोन्मेष प्रतिभा अशा विभागांमध्ये प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिंच्या हातून पुरस्कार प्रदान केले जातील. यावर्षीचे पुरस्कार विजेते कोण असतील ? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्याविषयीची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप लवकरच करणार आहेत.
याआधी पद्मश्री शाहीर साबळे (जीवन गौरव), ना. धों .महानोर, अशोक पत्की, सुलोचना चव्हाण, मंजिरी देव, जयंत पवार, पांडुरंग घोटकर, सुबोध भावे, राजाराम जामसांडेकर, विक्रम गोखले (जीवन गौरव ), पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोधापल्ले, डॉ. निलेश साबळे, शकुंतला नगरकर, अमित राज, मधुमंगेश कर्णिक (जीवन गौरव), वसंत अवसरीकर, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अच्युत ठाकूर, ज्योती म्हापसेकर, हरेंद्र जाधव, प्रेमानंद गज्वी, प्रशांत दामले, अशॊक वायंगणकर, प्राजक्ता कोळी, रवींद्र भिलारी, माया जाधव (जीवन गौरव) , जयंत सावरकर (जीवन गौरव), डॉ. विजया वाड, उत्तर केळकर, ओम राऊत, सत्यपाल महाराज, राजेश टोपे, फ.मु .शिंदे (जीवन गौरव), पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री श्रीमती पद्मा कोल्हे, संजय मोने, श्रीमती सुकन्या मोने, रवींद्र साठे, कमलबाई शिंदे, श्रेया बुगडे हे मान्यवर मृदगंध पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
आतापर्यंत संगीत समारोह मध्ये पद्मश्री पंडित सुरेश वाडकर,पद्मश्री उस्ताद राशीद खान, राहुल देशपांडे, महेश काळे, पद्मश्री पद्मजा फेणाणी, आरती अंकलीकर टिकेकर, शौनक अभिषेकी , शिवमणी, गणेश चंदनशिवे, लावणी साम्राज्ञी शकुंतला नगरकर, आदिती भागवत, सोनिया परचुरे, पंडित रोनू मुजुमदार, तौफिक कुरेशी आदि कलावंत मान्यवरांनी आपले सादरीकरण केले आहे.