प्रथमेश परबच्या चित्रपटांचा नवीन वर्षात धमाका!

मुंबई: दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘टाईमपास’ चित्रपट ३ जानेवारी २०१४ ला प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने लोकप्रियतेचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले. चित्रपटगृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकवले. यातील संवाद, गाणी आणि स्टाईल पॉप्युलर झालीच, पण त्यासोबतच चित्रपटाचा नायक असलेला दगडूने रसिकांच्या मनात घर केले. या चित्रपटाने दगडूच्या रूपात मराठी चित्रपटसृष्टीला प्रथमेश परब नावाचा सुपरस्टार दिला. ‘अँड स्टार इज बॉर्न’ ही इंग्रजी भाषेतील म्हण ‘टाईमपास’ने दगडूच्या रूपात खरी करून दाखवली. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल ११ वर्षे झाली असली तरी त्यातील गोडवा तसूभरही कमी झालेला नाही. या दरम्यान प्रथमेश मराठीतून हिंदीकडे झेपावला असून, तिथेही आपला अमीट ठसा उमटवण्यात यशस्वी होत आहे. नवीन वर्षात तो चित्रपटांचा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.

‘ए, तो बघ दगडू!’, ‘दगडू, एक सेल्फी काढू का?’, ‘दगडू, आता नवीन कोणता सिनेमा येतोय?’ या प्रश्नांनी सुखावणाऱ्या दगडूला प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ११ वर्षे झाली आहेत. एक व्यक्तिरेखा कशा प्रकारे एखाद्या कलाकाराच्या करियरला कलाटणी देऊ शकते आणि त्याचे संपूर्ण जीवनच पालटून टाकू शकते, याचे उत्तम उदाहरण दगडू आहे. या व्यक्तिरेखेने प्रथमेशला असा काही यशाचा मार्ग दाखवला की, त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नवनवीन व्यक्तिरेखांची आव्हाने स्वीकारत तो वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतच राहिला. याच कारणामुळे आज प्रथमेशच्या खिशात अतिशय महत्त्वाचे आगामी चित्रपट आहेत. ‘टाईमपास’ प्रदर्शित होऊन ११ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करत प्रथमेश म्हणाला की, आज ११ वर्षानंतरही, दगडू लोकांच्या लक्षात आहे, या प्रेमाबद्दल मी खरंच खूप कृतज्ञ आहे. माझं आयुष्य ३६० डिग्रीने बदलणारी एक संधी, एक व्यक्तिरेखा आणि त्यानंतर माझ्या आयुष्याचा झालेला अविभाज्य भाग! एखादा सिनेमा हिट झाला तरीही हा दगडू मला आठवतो किंवा एखादा सिनेमा फारसा चालला नाही तरीही! सिनेमा हिट झाल्यावर, ‘टाईमपास’च्या वेळचे ‘हाऊसफुल’चे फलक आठवतात. ‘आई, बाबा आणि साईबाबा शप्पथ’, असंच काम करत रहा, असं म्हणत दगडू माझं कौतुक करत असेल हे जाणवतं. त्याउलट जर एखादा सिनेमा फारसा चालला नाही तर, तू टेन्शन नको घेऊस रे, टेन्शनला, ‘चल ए, हवा आने दे’ असं म्हण आणि पुढे जा, असंही म्हणणारा दगडू मला जाणवतो. मला खरी ओळख दिली ती या दगडूने… यासाठी रवीसर, मेघना मॅडम आणि प्रियदर्शन दादाचे खूप खूप आभार…

मराठी चित्रपटांसोबत ‘दृश्यम’सारखा सुपरहिट हिंदी चित्रपट आणि ‘ताजा खबर’ ही रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या वेब सिरीजसह इतर बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकलेला प्रथमेश या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये आणखी काही महत्त्वपूर्ण चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. प्रथमेशच्या आगामी चित्रपटांच्या यादीत तूर्तास ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘मुंबई लोकल’, ‘सुसाट’, ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘हुक्की’ या चित्रपटांचा समावेश आहे. याखेरीज इतर काही चित्रपटांची बोलणी सुरू असून, हिंदीतही वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तो सज्ज झाला आहे. काही आगामी प्रोजेक्टसच्या गोष्टी सध्या प्राथमिक पातळीवर सुरू असल्याने त्याबाबत जास्त काही सांगणे शक्य नसल्याचे प्रथमेश म्हणाला. थोडक्यात काय तर रसिकांना नवीन वर्षात प्रथमेशच्या चित्रपटांचा धमाका अनुभवायला मिळणार आहे.