प्रा.देवदत्त पाठक यांच्या २१ मोफत अभिनय कार्यशाळा पूर्ण…

पुणे: गुरुस्कूल गुफानचे आयोजन रंगभूमी कला गावागावात झोपडपट्ट्यात आणि वंचितांसाठी पोहोचावी, त्यानिमित्ताने रंगभूमी कलेतील अभिनेते आणि रसिक प्रेक्षक तयार व्हावेत या कारणासाठी ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ लेखक व दिग्दर्शक प्रा.देवदत्त पाठक गेली अकरा वर्ष अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा गुरु आदेशानुसार मोफत घेत आहेत. अवघा महाराष्ट्र त्यांनी अकरा वर्षांमध्ये पिंजून काढला आहे.गावोगावी जाऊन, वस्त्यापाड्यांवरती राहून, केवळ आणि केवळ रंगभूमी कलेची रुजवात व्हावी आणि त्या अनुषंगाने नाट्यकला आणि अभिनय कला यांचे महत्त्व सर्वांना समजावे, यासाठी या मोफत अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जात आहेत.

१५ एप्रिल पासूनच २१ कार्यशाळांचे आयोजन कारंजा लाड,पंढरपूर, अकोला, नाशिक, अहिल्यानगर ,संभाजीनगर ,माणगाव, नऱ्हे आंबेगाव, पुणे येथील आजूबाजूची उपनगरे, वेगवेगळ्या स्वाधार, रेज ऑफ होप अक्षरदीपसारख्या सामाजिक संस्था आणि अनेक मराठी शाळा यांच्यासाठी हा अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा प्रकल्प घेतला गेला.अभिनय कलेबरोबर व्यक्तिमत्त्व, क्षमता विकसन आणि कलात्मक निर्मितीचा निर्दोष दृष्टिकोन यावा, याबाबत तयार केलेले रंगमंचीय खेळ या माध्यमातून या कार्यशाळा घेतल्या गेल्या. रंगमंचीय खेळांमधून कलावर्तन तंदुरुस्तीचा म्हणजेच जगण्यातील वागण्याचा असलेला उपयोग हा उद्या कुठल्याही क्षेत्रातील मुलांना समाज उपयोगी कसा ठरेल , गृह निर्माण संस्थांमध्ये निर्माण झालेले अंतर कमी करण्याचा हा एक छोटासा हा प्रयत्न आहे असे गुरुवर्य देवदत्त पाठक या निमित्ताने म्हणाले.

रंगभूमी कला ही सुसंवाद, समन्वय, समरसता ,सहकार्य आणि उत्तम सहजीवन कसे असावे हे शिकवते, त्यासाठी प्रत्येकाने आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे एकदा तरी रंगभूमी कलेचे शिबिर अथवा कार्यशाळा करायला हवी, यातून आपण स्वतः आपले घर, आपले गाव आणि आपला समाज हा सुशांत पद्धतीने ठेवू शकेल हे जाणवेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ गुरुवर्य देवदत्त पाठक यांनी केले .

यानिमित्ताने प्रत्येक कार्यशाळा संपल्यानंतर कार्यशाळेतील प्रत्येक मुलाला कलावर्तनाचे प्रमाणपत्र दिले गेले, त्याचप्रमाणे कार्यशाळातील सर्वोत्तम सहभागी आणि क्षमता संपन्न प्रशिक्षणार्थीला गुरुस्कूल गुफानचे स्मृतिचिन्ह देण्यात आले. ही कार्यशाळा घेण्यासाठी गेली २५ वर्षे सातत्याने गुरु स्कूलमध्ये राहून प्रशिक्षित झालेले प्रा. देवदत्त पाठक यांचे मिलिंद केळकर हे शिष्य त्यांच्याबरोबर होते ,उषा देशपांडे ,सीमा जोगदंनकर, गावागावातील संयोजक प्रणिता दसरे, श्रीकांत भाके, गीतांजली चव्हाण, विद्या सरदेशमुख, अंजली बापट, वैशाली कंक, दिलीप कोरके राजू ऊराडे, सचिन गिरी, ज्योती जगताप, स्वराली वाणी, इ.यांनी कार्यशाळा संपन्न करण्यासाठी आयोजनामध्ये मदत केली. अशा कार्यशाळा म्हणजे रंगभूमी कलेला नवसंजीवनी देतील आणि त्यातून कलाक्षेत्रात कार्यरत होण्यासाठी शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम कार्यकर्त्यांची एक फळी तयार होईल असे अनेक संयोजकांनी या निमित्ताने नमूद केले आहे.

प्रत्येक कार्यशाळेच्या शेवटी दोन प्रात्यक्षिक स्वरूप नाट्य प्रयोग सादर झाले आणि बालगट, कुमार गट,युवा गट यातील विद्यार्थ्यांनी आम्हाला रंगभूमी कलेकडे बघण्याचा नेमका दृष्टिकोन मिळाला आणि त्यासाठी कष्टसातत्य ,शिस्त, नवनिर्मितीचा संस्कार, विनम्रता हे चार गुण किती महत्त्वाचे आहेत हेही समजले अशी प्रतिक्रिया दिली. प्रा.देवदत्त पाठक यांच्या या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळा रंगभूमी केलेला तळागाळापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यातूनच गावामध्ये आणि गावाकडून शहराकडे रंगभूमी कलेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी युवा मंडळी स्वतःहून पुढे येत आहेत असे म्हणायला हरकत नाही.