‘कुतुहल’ बालगीत संग्रहाचे प्रकाशन

नवी मुंबई: कवयित्री सुचिता गणेश खाडे यांनी रचलेल्या ‘कुतुहल’ या बालगीत संग्रहाचे प्रकाशन २७ जुलैला वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ कवयित्री-साहित्यिक प्रा.प्रतिभा सराफ, दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत, साहित्यक राजेश साबळे ओतुरकर, कवि डॉ. गजानन मिटके उपस्थित होते.

बालसाहित्य हे आधीपासूनच निर्मितीच्या बाबतीत मागे असून पाचशे लेखकांत एखादा लेखक बाल साहित्यावरील पुस्तक लिहितो असे याप्रसंगी प्रा. प्रतिभा सराफ म्हणाल्या. मुलांसाठी या प्रकारचे साहित्य आले पाहिजे, ते मुलांपर्यंत पोहचवले पाहिजे, स्व-भाषेत सुचत नसेल तर प्रसंगी अन्य भाषांतील बालकांसाठीच्या कविता या अनुवादित करुन मुलांसमोर आणल्या पाहिजेत, असे मत प्रा. सराफ यांनी यावेळी नोंदवले. कुतुहल हे पुस्तक लिहिणाऱ्या सौ. सुचिता खाडे यांना विविध गीते ही पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मनापासून इच्छा असल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन राजेंद्र घरत यांनी या पुस्तकातील काही ओळी या वाचनानंद देण्याप्रमाणेच बालक-माता यांच्यामधील काही आनंदी क्षणही वाचकांसमोर तंतोतंत उभे करण्यात यशस्वी ठरल्या असल्याचे सांगत पाने, फुले, चंद्र, तारे, डोंगर, झाडे, पाऊस, फळे, झाडे या रुढ प्रतिमांप्रमाणेच मॅगी, पिझ्झा, बर्गर आदिंंचेही कालसुसंगत चित्रण या कवितांमधून आल्याचे आपल्या भाषणामधून सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे-ओतुरकर यांनी पुस्तक प्रकाशन, वितरणातील काही अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. कवयित्री सुचिता खाडे यांनी या पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विशद केली केवळ एका निरोपावर पाहुणे मंडळींनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्याबद्दल आपल्या मनोगतामधून कृतज्ञता व्यक्त केली. राजसा प्रकाशनकृत ‘कुतुहल’ या ५० पृष्ठांच्या बालगीत संग्रहामध्ये ३० बालगीतांचा समावेश आहे. या गीतांना समर्पक छायाचित्रे महेश कोंढाळकर यांनी रेखाटली आहेत.