मुंबई: ही एक सत्यघटना असून, ही ६७ वर्षांच्या सुधीर पाटील यांच्यासोबत घडली आहे. पाय दुखत असल्याने जवळपास ६ वर्ष पाटील यांना व्यवस्थित चालता येत नव्हते. विविध रुग्णालयांमध्ये पाटील जाऊन आले, मात्र योग्य निदान होऊ न शकल्याने त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले नाही. ज्यामुळे त्यांना होत असलेला त्रास कमी झाला नाही. मुंबई सेंट्रल स्थित वोक्हार्ट रुग्णालयातील डॉ. शीतल गोयल यांच्याशी संपर्क साधल्यानंतर मात्र पाटील यांच्या मनात आपण पुन्हा बरे होऊ शकतो ही आशा निर्माण झाली. पाटील यांना व्हॅस्कुलर क्लॉडिफिकेशनची समस्या होती. यावर केलेल्या उपायांमुळे सुधीर पाटील हे आज पुन्हा चालायला लागले आहेत. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही तासांतच पाटील यांना कोणत्याही वेदनेशिवाय चालता येऊ लागलं होतं. आपल्याला कोणत्याही त्रासाशिवाय चालता येत आहे हे कळाल्यानंतर त्यांना झालेला आनंद हा गगनात मावेनासा झाला होता.
सुधीर यांना पायदुखीचा त्रास होत होता आणि हा त्रास बळावत गेला. एकवेळ अशी आली की त्यांना एक पाऊल टाकणंही अवघड झालं. पाटील यांनी जवळपास ६ वर्ष त्यांनी वेदनेने विव्हळत काढली. या त्रासामुळे त्यांच्या हालचालीवरही मर्यादा आल्या होत्या. त्रास फारच व्हायला लागल्याने त्यांनी मुंबई सेंट्रलस्थित वोक्हार्ट रुग्णालयात येण्याचा निर्णय घेतला.
सुधीर पाटील वोक्हार्ट रुग्णालयात आल्यानंतर त्यांना होत असलेल्या त्रासाचे निदान करण्यासाठी डॉक्टरांचे एक पथक कामाला लागले होते. त्यांच्यावर बारकाईने चाचण्या, तपासण्या केल्यानंतर पाटील यांना होत असलेल्या त्रासामागचे कारण डॉक्टरांच्या लक्षात आले.
पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतल्यानंतर, सखोल चाचण्या केल्यानंतर डॉ. शीतल गोयल यांच्या लक्षात आले की पाटील यांना व्हॅस्कुलर क्लॉडिफिकेशनची समस्या आहे. व्हॅस्कुलर क्लॉडिफिकेशनमध्ये पायांच्या नसा जाम होतात ज्यामुळे रक्तपुरवठा नीट होत नाही.
व्हॅस्कुलर क्लॉडिफिकेशनचं निदान झालं असलं तरी नसा कुठे जाम झाल्या आहेत त्याचं अचूक ठिकाण कळणं गरजेचं होतं. डॉपलर चाचण्यांमध्येही नसा जाम झाल्याची नक्की जागा समजत नव्हती. यावर उपाय म्हणून डॉ.गोयल यांनी रेडियोलॉजिस्ट डॉ.अशोक बंसल आणि डॉ.अभिजीत सोनी यांची मदत घेतली. पाटील यांच्यावर डिजिटल सबट्रॅ्क्शन अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पाटील यांच्या पायातील नसा कुठे जाम झाल्या आहेत हे अचूकपणे कळणार होतं.
डिजिटल सबट्रॅ्क्शन अँजिओग्राफीमुळे हृदयापासून निघणारी महाधमनी ही ९० टक्के जाम झाली असल्याचे दिसून आले. यावर उपाय करत असताना अँजिओप्लास्टी करणे आणि स्टेंट घालणे यातून महाधमनीला इजा पोहोचण्याची शक्यता होती. यासाठी पाटील यांची संमती घेतल्यानंतर इंटरव्हेंशनल रेडियोलॉजिस्ट डॉ.अशोक बंसल आणि डॉ.अभिजीत सोनी यांनी कमीत कमी चीरफाड करत अत्यंत नाजूक प्रक्रिया पार पाडली.
या शस्त्रक्रियेनंतर पाटील यांना अवघ्या काही तासांतच वेदनेशिवाय पुन्हा चालता येऊ लागले. ६ वर्ष पंगू झालेल्या पाटील यांच्यासाठी हा क्षण फार उत्कट आणि भावनिक होता. चालता येऊ लागल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. आपला त्रास दूर केल्याबद्दल त्यांनी वोक्हार्ट रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले. शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी पाटील यांनी ५०० मीटरचे अंतर चालत सहज पार केले. पूर्वी इतकं चालणं त्यांना शक्यच होत नव्हते.
पाटील यांच्या केसवरून रुग्णाचे अचूक निदान होणे किती गरजेचे आहे हे अधोरेखित होते. निदानानंतर गुंतागुंतीच्या स्थितीत केली जाणारी शस्त्रक्रिया हे देखील अचूक निदानाइतकीच महत्त्वाची असते. सुधीर पाटील यांच्या या केसमुळे डॉक्टरांचे कौशल्य, रुग्णाला बरे करण्यासाठीची त्यांची धडपड आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर या गोष्टींची गरजही ठळकपणे दिसून येते.