सन्मान युवा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी नवरात्रोत्सवात तिरूपती बालाजी मंदिराची प्रतिकृती !

ठाणे:वर्तकनगरमध्ये सन्मान युवा प्रतिष्ठानच्या रौप्य महोत्सवी नवरात्रोत्सवात तिरूपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे.ठाण्यातील वर्तकनगरमधील ठाणे मनपा शाळा क्रमांक ४४ च्या पटांगणात “सन्मान युवा प्रतिष्ठान”तर्फे यंदा रौप्य महोत्सवी शारदीय नवरात्रौत्सव साजरा होत असून तिरुपती बालाजी मंदिराचा भव्य देखावा भाविकांच खास आकर्षण ठरले आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक,आयोजक राजेंद्र फाटक आणि माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने संपन्न होत असलेल्या या नवरात्रोत्सवात दररोज नित्य नियमाने सप्तशती पाठपठण,देवीची पूजा, आरती, शतचंडी याग, अष्टमीच्या दिवशी होमहवन, असे अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवात अभिनेता सुशांत शेलार प्रस्तुत “सन्मान दांडिया “ २०२४ मध्ये अक्षया आयर,सावनी रविंद्र, आनंदी जोशी, रोहित राऊत, पद्मनाभ गायकवाड,आदिश तेलंग,मयुर सुकाळे, राहुल मुखर्जी आदी गायकांच्या गीतांवर तरुणाई दांडिया नृत्याचा ताल धरत आहे.या कार्यक्रमात मराठी मालिका व चित्रपट सृष्टीतील कलाकारांची उपस्थिती खास आकर्षण ठरले आहे. येत्या आठ ऑक्टोबरला लावणी सम्राट आशमिक आनंद कामठे यांच्या सोबत खेळूया लावणी नृत्यासहित “ खेळ रंगला पैठणीचा” हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला असून यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिची उपस्थिती लक्षणीय ठरणार आहे. त्याचबरोबर उत्सव काळात “ माता की चौकी” व रिल्स व फॅन्सी ड्रेस स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.थोडक्यात सन्मान युवा प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सवी नवरात्रौत्सव धार्मिक कार्यक्रमाबरोबरच महिला,युवक, युवती यांच्या कलागुणांना वाव देणारा ठरला आहे. ‌