चित्रपटात शंकर-एहसान-लॉय या संगीत विश्वातील दिग्गज त्रिकुटांनी संगीतबद्ध केलेली १४ गाणी आणि १८ गायकांचा आवाज आहे. तसेच त्यातले ७ गायक तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.
मुंबई: मुंबईत जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा भव्य संगीत अनावरण सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव.
खाडिलकरांच्या ११४ वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा चित्रपट कट्यार काळजात घुसली तसेच आणि…डॉ. काशिनाथ घाणेकर यांसारख्या प्रतिष्ठित चित्रपटांचा समृद्ध वारसा पुढे नेत आहे. नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एका पेक्षा एक कलाकार आश्वासन देतायत की हा चित्रपट नक्कीच एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.
दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी संगीतबद्ध केली आहेत, या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे यांनी आपला आवाज दिला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.
“संगीत मानापमान” च्या या भव्यदिव्य संगीत अनावरण कार्यक्रमामध्ये संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. इतकच नव्हे तर गायकांद्वारा लाईव्ह परफॉर्मन्सचा आस्वाद सुद्धा प्रेक्षकांना घेता आला. संगीत मानापमान या मूळ नाटकातील गाजलेल्या गाण्यांचे आणि चित्रपटातील नवीन रचनांचे मिश्रण यावेळी पहायला मिळाले, प्रत्येक गायकाने आपलं गाणं स्टेजवर सादर करून प्रेक्षकांना आपल्या मधुर सुरांनी एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव दिला.
मीडिया अँड कंटेंट बिझनेस, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या अध्यक्षा ज्योती देशपांडे म्हणाल्या, ‘जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही काही तरी विलक्षण आणि भारताची सांस्कृतिक समृद्धी साजरी करणाऱ्या कथा मोठ्या पडद्यावर सादर करण्यास उत्सुक आहोत. संगीत मानापमान ही मराठी संगीत रंगभूमीच्या शाश्वत कलेला केलेले अभिवादन आहे, त्यामुळे सुमधुर असं संगीत आणि चित्रपटाची कथा महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडेल. शंकर-एहसान-लॉय यांच्या अलौकिक टॅलेंट आणि बुद्धिमत्तेसह, संगीत कसं सगळ्यांना एकत्रित करतं आणि प्रेरणा देऊ शकतं याचं हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. संगीत मानापमान व्दारे कलेचा एक उत्कृष्ट नमुना जागतिक स्तरावर प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय.’
संगीतकार शंकर महादेवन यांनी सांगितलं, ‘१८ अविश्वसनीय प्रतिभावान गायकांसोबत काम करणं एक अद्भूत अनुभव आहे. मी याआधीही सुबोधच्या कट्यार काळजात घुसली मध्ये संगीत दिलं असंल, तरी या चित्रपटाच्या संगीतात नावीन्य आहे. समीर सामंत यांचे गीत खरोखरच खूपच रिफ्रेशिंग आहेत, त्यामुळे खात्री आहे कि या संगीताच्या म्युझिकल प्रवासात प्रेक्षक नक्कीच मंत्रमुग्ध होतील आणि यासाठी मी संपूर्ण टीमचा खूप खूप आभारी आहे, त्यांच्या मेहनतीचं कौतुक करतो. जीओ स्टुडिओजच्या निमित्ताने नक्कीच “संगीत मानापमान” ला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे आणि सारेगामा सारख्या मोठ्या म्युझिक कंपनीच्या सहाय्याने ही गाणी अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.’
दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे म्हणाले, ‘कट्यार काळजात घुसलीच्या घवघवीत यशानंतर आम्ही संगीत मानापमान सादर करत आहोत, जे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. दिग्गज त्रिकूट शंकर-एहसान-लॉय, १८ प्रतिभावान गायकांनी सजलेल्या भावपूर्ण रचनांची जादू मोठ्या पद्यावर जादू मोठ्या पडद्यावर नक्किच दिसेल. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे यांच्या पाठिंब्याने, आम्हाला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर निरंतर प्रभाव पाडेल .’
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित “संगीत मानापमान” चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. अशाप्रकारे १० जानेवारी २०२५ ला संगीताने नटलेला चित्रपट थिएटरमध्ये अनुभवायला सज्ज व्हा.