विद्या विकास मंडळ विद्यालयाचे संस्कार शिक्षण

मुंबई: सामान्य परिस्थितीतील व प्रामुख्याने वंचित वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या हितचिंतकांच्या मदतीने उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करुन विद्या विकास मंडळ विद्यालयामध्ये संस्कार शिक्षण दिले जाते. फक्त घेणारे हात तयार न करता आपण सुध्दा समाजातील वंचितांसाठी जमेल तशी मदत करु शकतो, हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात विद्या विकासचे शिक्षक रुजवतात.

शाळेच्या विद्यार्थी संसदेतील पंतप्रधान हर्ष पाचाडकर व अध्यक्ष तन्वी टिपराळे यांच्यासह सर्व निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी या वर्षी ‘अनिर्वेध’ या दृष्टीहीन बांधवांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे संस्थापक सचिन व अंजली सरकाळे या दाम्पत्याला शाळेत बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. ते करीत असलेले काम समजून घेतले व त्यांचे कौतुक केले.

गुरुपौर्णिमेला शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिस्थितीनुसार कलशात अर्पण केलेल्या गुरुदक्षिणेची रक्कम अनिर्वेध या दृष्टीहीन बांधवांसाठी कार्य करत असलेल्या संस्थेला देण्याचा निर्णय विद्यार्थी प्रतिनिधींनी घेतला आणि जमलेल्या रकमेचा धनादेश सरकाळे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी सरकाळे उभयतांनी अनिर्वेध संस्था व ते करत असलेल्या कार्याविषयी मुलांशी मनमोकळा संवाद साधला आणि मुलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.सचिन सरकाळे हे देखील विद्या विकासच्या संस्कारात घडलेले शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.