सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते “धर्मवीर – २” चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न

ठाणे: साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट उलगडण्यासाठी सज्ज असलेल्या “धर्मवीर – २” या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकतेच या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा सुप्रसिध्द ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, म्युझिक टीम आणि इतर मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती. या संगीत अनावरण कार्यक्रमासोबतच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ‘आनंद माझा’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

“धर्मवीर – २” या चित्रपटाची निर्मिती साहील मोशन आर्ट्सचे मंगेश जीवन देसाई आणि झी स्टुडिओजचे उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी निभावली असून कॅमेरा मन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे. काही दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलेल्या चित्रपटाच्या टीजरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची गाणी अल्पावधीतच प्रचंड गाजली होती. त्यामुळे आता “धर्मवीर – २” चित्रपटातील गाणी पाहिल्यावर चित्रपटाचं कथानक, कलाकार यविषयाची लोकांना असलेली उत्सुकता खूपच वाढली आहे.

मराठी सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच संगीत अनावरण सोहळा शालेय मुलाच्या उपस्थित पार पाडला, यावेळी गुरु पोर्णिमा आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने तब्बल ४५ बाल कलाकारानी पहिल्यांदाच धर्मवीर चित्रपटातील “गुरुपौर्णिमा” हे गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली.

स्वर्गीय आनंद दिघे यांनी राजकारण आणि समाजकारणाचा सुंदर मेळ घातला होता. त्यामुळेच त्यांची प्रचंड लोकप्रियता निर्माण झाली होती. शालेय विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा सुरू करण्याचा पहिला प्रयत्न दिघे साहेबांनीच सुरू केला होता. त्यामुळे चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात गुरू पौर्णिमा गाण्याच्या सादरीकरणासह “चला करू तयारी…” हे गाणं उपस्थितांना दाखविण्यात आले. त्याशिवाय दहावीतील परीक्षेतील उत्तम गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं “आनंद माझा” पुरस्कार देऊन कौतुक करण्यात आले.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर म्हणतात दिघे साहेबांना मी जवळून भेटलो आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावर भीती वाटायची पण मनातून एकदम निर्मळ होते. हा चित्रपट ९८ आठवडे चालावा अशा मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलावल्याबदल मी सर्वांचे आभार मानतो

“आनंद माझा” पुरस्कराची संकल्पना सांगताना निर्माते मंगेश देसाई म्हणाले सराव परीक्षा सुरु करुन धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिक्षण क्षेत्रात एक महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या सराव परीक्षांमुळे मुलांना असलेली गणितचीच नाही तर इतर विषयांची असलेली एक प्रकारची भी ती कमी करण्याचा साहेबांनी प्रयत्न केला. अनेक विषयांमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे विद्यार्थी हे आज आपण बघतो त्यांचे कौतुक आणि सत्कारही आपण बघतो. आपणही यावर्षापासून अशा मुलांचा गौरव करुन दिघे साहेबांची आठवण म्हणून प्रशस्तिपत्रक, स्मृतिचिन्ह तसेच ज्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळाले आहेत अशा विद्यार्थी – विद्यार्थिनीना धनादेशही मी देणार आहे. पुढेही ही हा उपक्रम मी सुरु ठेवणार असल्याचे निर्माते मंगेश जीवन देसाई यांनी सांगितले.

उमेश कुमार बन्सल, मुख्य व्यवसाय अधिकारी, जी स्टुडिओज, म्हणाले, “‘धर्मवीर – २’ च्या संगीत अनावरण सोहळ्याद्वारे आम्ही प्रेक्षकांना एक अद्वितीय आणि प्रेरणादायी अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजाने सजलेली ही गाणी चित्रपटाच्या कथानकाला भावनिक खोली आणि सुसंवाद प्रदान करतील. आम्हाला खात्री आहे की ही गाणी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतील आणि चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळेल.

चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे , डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश – विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग,विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात मराठी आणि हिंदी गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

धर्मवीर – २ चित्रपटातील गाणी आपल्याला विविध म्युझिक प्लॅटफॉर्मवर बघण्यासाठी उपलब्ध आहेत. येत्या ९ ऑगस्टला “धर्मवीर – २” हा चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.