मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचालित श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर प्राथमिक शाळेस ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा ‘ अभियान टप्पा- ०२ अंतर्गत ‘तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले’. बक्षीस म्हणून शाळेला रुपये तीन लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.अंधेरी तालुक्यातील सर्व बोर्डस् व सर्व माध्यमांच्या सुमारे ५०० हून अधिक शाळांमधून शाळेची शिक्षण विभागाकडून प्रथम क्रमांकासाठी निवड करण्यात आली .जुहू सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये समाजातील वंचित घटकांसाठी ही शाळा कार्यरत आहे. श्रमजीवी वस्त्यांमधील पालकांची पहिल्या पसंतीची ही प्राथमिक शाळा आहे.
शाळेत विद्यार्थी विकासासाठी इयत्ता पहिलीपासून मल्लखांब, लाठीकाठी, कराटे तायकांडो, नृत्य संगीत ,चित्रकला, हस्तकला आणि संभाषणात्मक इंग्रजी हे विषय अग्रक्रमाने शिकवले जातात. बालवाडी पासून विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे दिले जातात. प्राथमिक विभागातील विद्यार्थी छोटे- छोटे घटक घेऊन प्रझेंटेशन सादर करतात .सेमी इंग्रजीच्या धरती इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना गणित विषयाचे अध्यापन केले जाते. मुलांबरोबर पालकांच्या अभ्युदयाकडे शाळा प्रशासन विशेष लक्ष देत आहे. संस्थेच्या दोन रात्र विद्यालयातून पालकांना दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली जात आहे. तसेच माता-पालकांसाठी संगणक साक्षरता वर्ग चालवले जातात. शाळेकडून राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत शिक्षण विभागाने शाळेचा बहुमान केला आहे. या उपलब्धीबद्दल उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डॉ. साधना मोढ व कोषाध्यक्ष विनायक दामले, प्राथमिक विभागाच्या सचिव सुजाता मराठे यांनी शाळेचे मुख्याध्यापक संतोष टक्के व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.