मुंबई: सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांना ‘नाफा’ मराठी चित्रपट महोत्सवाचे विशेष निमंत्रण नाफाचे संस्थापक अभिजित घोलप यांनी नुकतेच दिले. नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित घोलप यांनी महाराष्ट्रात येऊन सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांना या सोहळ्याचे रितसर निमंत्रण दिले आहे. अॅड. आशिष शेलार यांनी त्यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत तात्काळ होकार दिला आहे. विशेष म्हणजे अमेरिकाच्या ‘सॅनहोजे’ कॅलिफोर्नियाचे महापौर मॅट महन यांनीही या महोत्सवास उपस्थित राहण्याचे मान्य केल्याने हा एक दुग्धशर्करा योग चालून आला असून यानिमित्ताने या दोन महनीय अतिथींच्या उपस्थितीने यंदाची अवार्ड नाईट आणि महोत्सव विशेष ठरणार असल्याची भावना अभिजित घोलप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मराठी चित्रपटांना हॉलिवूडच्या झगमगाटात सन्मानानं सादर करणाऱ्या ‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’तर्फे (नाफा) आयोजित दुसऱ्या भव्य मराठी चित्रपट महोत्सवाला सॅनहोजे कॅलिफोर्निया इथं २५ ते २७ जुलै २०२५ या कालावधीत रंगतदार सुरुवात होणार आहे. कॅलिफोर्निया थिएटर या प्रतिष्ठित स्थळी हा सोहळा आयोजित केला जाणार असून यंदाचा महोत्सव अधिक भव्य आणि लक्षवेधी ठरणार आहे. ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या चित्रपटांचे निर्माते, सुवर्ण-कमळ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित अभिजीत घोलप यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाची सुरुवात गेल्यावर्षी करण्यात आली आहे. यावर्षी या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री अॅड. आशिष शेलार यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच ‘सॅनहोजे’ कॅलिफोर्निया स्टेटचे महापौर यांनाही या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आलं असून दोन्ही अतिथींनी संस्थेला त्यांचा तात्काळ होकार कळविला आहे. सॅनहोजेचे महापौर आणि महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र येत आल्याचे नाफा संस्थापक अभिजित घोलप यांनी जाहीर केले आहे.
‘नाफा’ हा उत्तर अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांच्या सहकार्यातून सुरु करण्यात आलेला मराठी चित्रपटांसाठी स्थापन झालेला एकमेव मंच असून मराठी चित्रपटांच्या व्यावसायिक आणि कलात्मक उन्नतीसाठी सतत कार्यरत आहे. अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीला हॉलिवूडसदृश दर्जा, ग्लॅमर आणि व्यावसायिक यश प्राप्त करून देण्यासाठी ‘नाफा’ कटिबद्ध आहे.