मुंबई: मानखुर्दमधल्या बच्चे मंडळींसाठीच्या तारांगण विशेष सेल्फी पॉईंटचे खासदार राहुल शेवाळे आणि शालेय विद्यार्थ्यांनी लोकार्पण केले. मुंबईमधल्या मानखुर्द येथे बच्चे मंडळींसाठी एक नवे आकर्षण सुरू झाले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) प्रवेशद्वारासमोरील कै. बिंदुमाधव ठाकरे उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण सेल्फी पॉइंटचे शालेय विद्यार्थ्यांनी उध्दघाटन केले. यावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे, विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती आदी उपस्थित होते.
तारांगणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेला हा मुंबईतील पहिला सेल्फी पॉईंट असून खासदार राहुल शेवाळे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी उद्यान येथे सेल्फी पॉईंट उभारणारे आर्टिस्ट सुरेश तारकर यांनी फायबर आणि इतर सामुग्रीचा वापर करून हा तारांगण सेल्फी पॉइंट बनवला आहे. सुमारे १५० फुटांवर उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंटमध्ये सहा फुटांचा सूर्य आणि त्याभोवती पृथ्वीसह अन्य ग्रह दाखविण्यात आले आहेत. याशिवाय अंतराळयान, आकाशात सोडलेला उपग्रह, चंद्र यांच्या प्रतिकृतीदेखील येथील खास आकर्षण ठरणार आहे.