लक्ष्मी निवास टीमचं रिक्षा चालकांसोबत १०० भागांचं सेलिब्रेशन
मुंबई: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेने १०० भागांचा हृदयस्पर्शी टप्पा गाठला. पण हा आनंद द्विगुणित तेव्हा झाला जेव्हा मुंबईचे रिक्षाचालक या उत्सवात सहभागी झाले. ‘लक्ष्मी निवास’ टीमने एका खास सेलिब्रेशनसाठी रिक्षाचालकांना आपल्या सेटवर आमंत्रित केले. सध्याची कथा, जिथे श्रीनिवास, एका रिक्षाचालकाची भूमिका साकारत आहे, त्यांची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. हे सर्व कष्ट सुरु आहेत एक हक्काच्या घरासाठी. या वेळेस मालिकेतील सर्व कलाकार सामील झाले. रिक्षाचालकांनी, लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव ऐकून लक्ष्मीचे डोळे ही पाणावले. त्यांच्या मेहनतीचे किस्से ऐकल्यावर त्यांना आपल्या गोड आणि साहसी शब्दांनी प्रोत्साहन दिले.
लक्ष्मी म्हणजेच हर्षदा खानविलकर यांनी सांगितले कि, मी अनेकदा मुंबईच्या रिक्षामध्ये प्रवास केला, भलेही रात्रीचे २ किंवा ३ वाजले असतील पण मला नेहमीच सुरक्षितपणे घरी पोहचवले आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. अशा अनेक गप्पा सुरु असतानाच लक्ष्मी निवासचं संपूर्ण कुटुंब सेटवर पोहचलं आणि सर्वानी मिळून यशस्वी १०० भाग पूर्ण झाले याच सेलिब्रेशन म्हणून रिक्षाचालक भावांसोबत केक कापला.
मालिकेत श्रीनिवासची भूमिका साकारत असलेली तुषार दळवी म्हणाले, ‘आपल्या या रिक्षाचालक बंधूंच्या प्रेरणादायी कथा ऐकून, त्यांच्या कुटुंबांप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे मी खूप भारावून गेलो. आम्ही ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत याच लोकांच्या खऱ्या आयुष्यातले अनुभव टीव्ही स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. आज या निमित्ताने परत आम्हाला आठवण झाली की आपण या कथा का सांगतो, सामान्य माणसाची ताकद आणि लवचिकता प्रतिबिंबित करण्यासाठी.’
रिक्षाचालक बंधू वेळात वेळ काढून ‘लक्ष्मी निवास’ सेटवर आले आणि श्रीनिवास, लक्ष्मी सोबत गप्पा मारल्या आणि १०० भागांच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले म्हणून झी मराठी आणि लक्ष्मी निवास कुटुंबाकडून आंब्यांची पेटी भेट दिली गेली.
पाहायला विसरू नका ‘लक्ष्मी निवास’ दररोज रात्री ८ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.