भारतीय स्टेट बॅंकेने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना केले सन्मानित!

एएलआयएमसीओच्या सहकार्याने देशभरातील २० ठिकाणी अंदाजे ९००० दिव्यांगांना सहाय्य उपकरणांचे करणार वितरण…

मुंबई:भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक खेळांतील भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा विशेष सन्मान केला. या कार्यक्रमात भारतीय स्टेट बॅंकेनं २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव केला, ज्यामुळे भारतानं पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतचे सर्वोत्तम १८वे स्थान संपादन केले.

‘पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक खेळांतील भारताची कामगिरी आपल्या राष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा आहे. या खेळाडूंनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अशक्य गोष्टी साध्य करून दाखवल्या आणि संपूर्ण देशाला प्रेरित केले आहे. एसबीआयमध्ये आम्हाला या विजेत्यांना प्रोत्साहन देण्याचा सन्मान लाभला आहे आणि आम्ही भारतीय क्रीडेसाठी समृद्ध, सर्वसमावेशक पर्यावरण तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’असे भारतीय स्टेट बॅंकेचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी म्हणाले.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक खेळांतील सुवर्णपदक विजेते हरविंदर सिंग, सुमित अंतिल, धरमबीर, प्रविण कुमार, नवदीप सिंग, नितेश कुमार, अवनी लेखरा क्रीडापटू रौप्यपदक विजेते निशाद कुमार, योगेश कंठुनिया, शरद कुमार, अजीत सिंग, सचिन खिलारी, प्रणव सूर्मा, थुलसीमथी मुरुगेशन, सुहास यथिराज, मनीष नरवाल खेळाडू आणि कांस्यपदक विजेत्या शीतल देवी, राकेश कुमार, प्रीती पाल, दीप्ती जीवनजी, मरियप्पन थंगावेलू, सुंदर सिंग गुर्जर, होकाटो होतोझे सेमा, सिमरन शर्मा, मनीषा रामदास, नित्या श्री शिवन, कपिल परमार, मोना अगरवाल, रुबिना फ्रान्सिस यांचा गौरव केला.

भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) एएलआयएमसीओसोबत (आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) वर्ष २०२४-२५ उद्योगसमूहांचे सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत भागीदारी जाहीर केली. या उपक्रमाद्वारे देशभरातल्या २० ठिकाणी सुमारे ९,००० दिव्यांगांना सहाय्य उपकरणांचे वितरण करण्यात येणार आहे. हा उपक्रम व्यक्तींना सशक्त बनवणे, समावेशकता वाढवणे आणि भारतीय क्रीडेला पाठिंबा देण्याच्या एसबीआयच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.