मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या १२ दुर्गांना युनेस्कोने वर्ष २०२५ ला जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केले . यानिमित्ताने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी अंधेरी येथील विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे दीपावलीच्या निमित्ताने रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग यासारख्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवून राजांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपला ऐतिहासिक परंपरेचा वारसा जतन केला आहे.
अर्णव सौंदळकर , शुभम ताम्हणकर, शिवराज हिंगमिरे, नक्ष गुळांबे आदी विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात माजी विद्यार्थी तुषार राणे, स्वप्निल मिस्त्री आणि वसंत दाभाडे, दिपाली पाटील, वनिता दराडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
‘दिवाळीच्या सुट्टीनंतर युनेस्कोने निवड केलेल्या या १२ दुर्गांविषयी माहिती संकलित करून दुर्ग भवन या नावाचा उपक्रम राबविण्याचा आमचा विचार आहे आणि या विषयीचे विद्यार्थ्यांमध्ये चर्चासत्र घडवून आणण्याचे शाळेने ठरविले आहे,’ असे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती मंत्री यांनी सांगितले.